पुणे : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) पुणे मंडळाच्या वतीने पिंपळे सौदागर, बावधन, एफ.सी. रोड आणि वाघोली येथे ‘मासिक रिटेल ऋण संपर्क मेळावा’ आयोजित करण्यात आला. ग्राहकांना तत्पर आणि सुलभ रिटेल कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या आर्थिक गरजा जाणून घेऊन योग्य मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

मंडळ प्रमुख देवेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून आयोजित या मेळाव्यास नवी दिल्ली येथील प्रधान कार्यालयातील आयबीडी विभागाचे महाव्यवस्थापक प्रभात रंजन प्रधान उपस्थित होते. या मेळाव्यात ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मालमत्ता कर्ज व तारण कर्ज याबाबत माहिती देत पात्र ग्राहकांना कर्ज मंजुरी देण्यात आली.
मंडळ प्रमुख देवेंद्र सिंह यांनी उपस्थित मान्यवर व ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले, तर प्रभात रंजन प्रधान यांनी बँक-ग्राहक संबंध व ग्राहकांच्या हक्कांवर भाष्य केले. या मेळाव्यात सहभागी ग्राहकांनी पीएनबीच्या सेवांबद्दल समाधान व्यक्त करत अनुभवही मांडले.
पुणेतील नामवंत बांधकाम व्यावसायिक व उद्योजकांच्या सहभागामुळे मेळाव्याला उत्साहाचे वातावरण लाभले. रोहित जैन, राजीव कुमार राय, व्ही. श्रीनिवास रेड्डी (असिस्टंट जनरल मॅनेजर्स), मनीषा शर्मा (पीएलपी, पुणे हेड), यशबीर पांडे (चीफ मॅनेजर) यांसह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व शाखांच्या सक्रीय सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.