पुणे- सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे अविनाश कार्गो प्रा. लि. (ACPL) कंपनीच्या व्यवस्थापकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी चार महिन्यांचा “लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम” यशस्वीरित्या राबवण्यात आला. जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचा समारोप नुकताच प्रमाणपत्र वितरण समारंभाने करण्यात आला.

प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलताना डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, एसएसपीयु म्हणाल्या, “व्यावसायिक जगात तांत्रिक प्रगतीमुळे सतत बदल होत आहेत. यामुळे प्रत्येक नोकरदार व्यक्तीने डिजिटल टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या नव्या कौशल्यांचे अध्यान घेणे आवश्यक झाले आहे. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांबरोबरच कार्यरत कर्मचाऱ्यांनाही नव्या तंत्रज्ञानासाठी सक्षम बनविण्याचे काम करत आहे.”
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात CRM टीम, सेल्स टीम, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आणि एक्स्पोर्ट ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधील फ्रंटलाइन लीडर्सचा समावेश होता. एकूण २९ कर्मचाऱ्यांनी नेतृत्व कौशल्ये, निर्णय क्षमतेचे विकास, कार्यसंघ व्यवस्थापन यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण घेतले.
अविनाश कार्गो प्रा. लि.चे संचालक अविनाश शेळके यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना अधिक परिणामकारक पद्धतीने काम करता येते. साधारण शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, आणि हे प्रशिक्षण त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.”
एसएसपीयुच्या स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्सचे संचालक राघवन संथानम यांनी नमूद केले की, “भारतामध्ये शाळा व महाविद्यालये भरपूर आहेत, मात्र व्यावसायिक कामासाठी लागणाऱ्या प्रत्यक्ष कौशल्यांचे प्रशिक्षण कमी दिले जाते. ही गरज ओळखून सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी व्यावसायिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सक्रियपणे योगदान देत आहे.”
यापूर्वी, या प्रशिक्षण उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात अविनाश कार्गोच्या लॉजिस्टिक्स ऑपरेशन्समधील ३० कंट्री मॅनेजर्सना देखील विशेष प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात आले होते.
हा उपक्रम केवळ कर्मचाऱ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठीच नव्हे तर उद्योगाच्या एकूण उत्पादकता वाढीसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरत आहे.