रामजन्मभूमी आंदोलन हे हिंदुत्ववादी यांनी उभारलेले आंदोलन असत्याच्या आधारे उभारलेले आहे.अयोध्या मधील विविध जमिनीचे वाद पूर्वी पासून होते त्याचा मूळ राम जन्मभूमीशी वाद नव्हता. पण १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषद यांनी याबाबत आंदोलन सुरू केले. शाहबानो प्रकरणामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर अल्पसंख्याक लांगुलचालन बाबत आरोप झाले आणि धार्मिक दबावाने अयोध्या मध्ये मंदिरांचे कुलूप उघडले गेले. नंतर उन्मादी धार्मिक वातावरणात बाबरी पाडण्याचा पुढील प्रकार घडला गेला. न्यायालयाचे पक्षपाती निर्णय, संघाचे कट्टरवादी आक्रमण, काँग्रेसचा छुपा पाठिंबा आणि बेजबाबदारपणा यामुळे हे घडले गेले. वेगवेगळ्या भूमिका त्या विविध प्रकारे मांडत असतात.लव्ह जिहाद सारखा प्रकार अस्तित्वात नाही पण याबाबत जाणीवपूर्वक प्रोपागंडा निर्माण केला जातो.असत्याचा किलकिलाटा मध्ये सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. बहुमताची दहशत आज प्रचंड असून अल्पसंख्याक आवाज दाबले जात आहेत असे मत लेखक, प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे ” राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे” आयोजन गांधी भवन कोथरूड याठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये” सत्य असत्याशी मन केले ग्वाही “या विषयावर लेखक आणि मराठी विषयाचे प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.शिवाजीराव कदम, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन ,तेजस भालेराव, चिन्मय कदम उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, आज आपण अशा काळात जगतो जिथे सत्य आणि असत्य याची सरमिसळ केली जात आहे. संभ्रम निर्माण केला जाणाऱ्या वास्तवात आपण भागीदार आहे. संभ्रम संपविण्यासाठी आपली बुद्धी आणि विवेक जागृत ठेवणे आवश्यक आहे. बहुमतापेक्षा आपले म्हणणे वेगळे आहे सांगण्यासाठी विवेक जागृत असणे महत्त्वपूर्ण आहे. बहुमत शहाणपणाचे हवे पण सध्या ज्या बाजूला बहुमत आहे त्याच बाजूला सहज जाणे होत आहे.
वेगवगेळ्या झुंड समाजात तयार झाल्या असून त्याने सत्य दडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोनम वांगचुक हे साधी राज्याची गांधी मार्गाने मागणी करूनही त्यांच्यावर दडपशाही करण्यात येत आहे. बहुमत आधारे सरकार निवडून येतात पण आता समाजात वेगवेगळ्या टोळ्या बनवून जाणिवपूर्वक टोळ्यांचे राजकारण सुरू आहे. चिकित्सा जागृत ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले, मी मूळचा परभणी मधील रहिवासी आहे.लहानपणी माझ्या घरी कट्टर हिंदुत्ववादी आणि धार्मिक वातावरण होते. त्याकाळी मी देखील अनेक ठिकाणी कीर्तन करत होतो. घरात संघाच्या कार्यकर्त्यांचा नेहमी वावर होता. परभणी मध्ये संघाची शहर जबाबदारी देखील मी स्वीकारली. त्याकाळी अयोध्या मधील रामजन्मभूमी आंदोलन सुरू होते. १९९० साली माझी आई आणि काका कारसेवा करण्यासाठी गेले होते.२ डिसेंबर १९९० रोजी मी देखील कारसेवा करण्यासाठी गेलो होतो.पुढे तीन दिवस आम्ही अयोध्या फिरलो. ६ डिसेंबर रोजी कारसेवा सुरू झाली. अनेक नेत्यांची भाषणे सुरू झाली. मी देखील ढाचा पर्यंत जाऊन पोहचलो.प्रत्यक्ष नियोजनरित्या सर्व काम विविध तुकड्या मध्ये सुरू होते,परंतु बांधकाम पाडणे उत्स्फूर्त प्रतिक्रिया नव्हती हे मला जाणवले. नऊ डिसेंबर रोजी परभणीत आलो तेव्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली . त्यामुळे माझ्या मनात चुकीची भावना निर्माण झाली. गावातील चांगले वातावरण बिघडले होते. एक वर्षाने शिक्षणासाठी मी मुंबईत गेलो. ग्रंथालयात मी विविध पुस्तके वाचन केल्यावर धर्म, देश, संस्कृती बाबत अनेक गोष्टी समजल्या गेल्या.भारतीय संस्कृती केवळ वैदिक नसून ती व्यापक असल्याचे समजून आले. प्रश्नांचा गुंता देखील उलगडत होता. धार्मिक उन्माद यावर ” एक होता कारसेवक” असे एक पुस्तक मी त्याकाळी लिहिले. त्यातील गोष्ट अद्याप लागू होतात याची लेखक म्हणून मला लाज वाटते. धर्म व्यवस्था, राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि भांडवलशाही याच्या संगनमताने जो उन्माद सुरू तो चिंताजनक आहे.
डॉ.शिवाजीराव कदम म्हणाले, आजचे लेखक यांनी समाजातील सद्यस्थिती बाबत परखड मत मांडले आहे. आजचे व्याख्यान देशातील वाटचाली बाबत ऊहापोह करणारे आहे. महात्मा गांधी यांनी जे सत्याचे प्रयोग तत्वे मांडले त्यादिशेने सर्वांनी जाणे महत्वपूर्ण आहे.असे ते शेवटी म्हणाले.