चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणारा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ डिसेंबरपासून पुण्यात
अभिनेते मकरंद अनासपुरेंना ‘निळुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार होणार प्रदान
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने आयोजित ८ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०२५ याचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे उत्साहात पार पडणार आहे. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे, प्रतिमा परदेशी, सहसंयोजिका नेहा भुकण, निलेश रसाळ यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक व संपादक महावीरभाई जोंधळे व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून “तुंबाड फेम” व लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मायासभा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे, वीणा जामकर, दीपक दामले, गिरीश पटेल, अंकुर जे. सिंग, आशिष निनगुरकर, समीर दिक्षित, ऋषिकेश भिरंगी, सुनील सुकथनकर, उमेश कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक व चित्रपट समीक्षक उपस्थित राहणार आहेत.
२६ ते २८ डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील एकूण ७० निवडक चित्रपटांचे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट स्क्रिनिंगसोबतच विशेष चित्रपट चर्चा, दिग्दर्शकांशी संवाद सत्रे आणि वैचारिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात ऋत्विक घटक यांच्या ‘सुबर्णरेखा’ या चित्रपटावर विशेष संवाद सत्र होणार असून. महोत्सवाचा समारोप नितेश हेगडे दिग्दर्शित ‘वाघाची पहाणी’ (Tiger’s Pond)’ या चित्रपटाने होणार आहे.
या वर्षीचा ‘निळुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार – २०२५’ प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक भान जपणारे कलाकार मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला असून, पुरस्कार वितरण सोहळा २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. हा पुरस्कार प्रसिध्द नाटककार,लेखक व प्राध्यापक, अभिनेते प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित AI चित्रप्रदर्शन, भरवण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, संघर्ष आणि परिवर्तनाचा विचार मांडणारा हा महोत्सव पुण्यातील चित्रपटप्रेमींसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरत आहे.त्यामुळे पुणे व राज्यातील सिनेमाप्रेमींनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.


