रत्नागिरी: मंडणगड येथे झालेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील रहाल. जेणेकरुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.

मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) अमृता जोशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत, सदस्य संग्राम देसाई, वकील संघाचे अध्यक्ष मिलींद लोखंडे, आमदार किरण सामंत, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी,विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आदी उपस्थित होते.

सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालय इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण करण्यात आले. यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. न्यायदान कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश श्रीमती जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले. येथील ग्रंथालयाचेही उद्घाटन आणि पाहणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या समारंभात मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यायमूर्ती म्हणून मला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन आणि आजच्या मंडणगड न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम माझ्या २२ वर्षाच्या सेवेमधील महत्त्वाचे आहेत. अतिशय कमी वेळेत मंडणगड येथे न्यायालय सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मंडणगड न्यायालयाच्या भूमिपूजनाला आम्ही दोघे उपस्थित होतो आणि आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही आम्ही दोघे उपस्थित आहोत. हा गौरवाचा क्षण आहे. महाराष्ट्र शासन विशेषत: विधी व न्याय विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मी आभार मानतो, त्यांनी मला या इमारतीच्या उद्घाटनाची संधी दिली.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पालक न्यायमूर्ती जामदार यांनी प्रास्ताविक केले. वकील संघाचे अध्यक्ष लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, संविधान उद्देशिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्जवलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास वकील, पक्षकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.