25.1 C
New Delhi
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रनव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे - योगेश सोमण 

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण 

मसाप निवडणूक 'साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध 

पिंपरी,-  साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ आगामी काळात ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले. 

    शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह पदाचे उमेदवार डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर आणि पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

   यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक पद्धतीने आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल, असे योगेश सोमण यांनी सांगितले.  

   प्रमुख कार्यवाह पदाचे उमेदवार डॉ. स्वाती महाळंक यांनी सांगितले की, राज्यभर कार्यरत असलेल्या परिषदेच्या विविध जिल्हा शाखा अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक अर्थसाह्य देण्याचे धोरण राबवले जाईल. या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

    दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना दर्जेदार लेखनासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच युवा लेखकांना योग्य दिशा मिळावी यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जाणार आहेत असे डॉ. स्वाती महाळंक यांनी सांगितले.

   कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर यांनी सांगितले की, परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या परीक्षांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, तसेच परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच परिषदेच्या आजीव सदस्यांना ग्रंथ प्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देणे आणि ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा एकदा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर स्पष्ट करण्यात आले.

    पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी सांगितले की, ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या ‘१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या’ निमित्ताने कार्यक्षेत्रात १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. तसेच ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहित्य निर्मिती करताना लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे.

   या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत. तसेच पुणे जिल्हा कार्यवाह पदासाठी संदीप भानुदास तापकीर हे उमेदवार आहेत. इतर पदासाठी आघाडीचे अन्य सात उमेदवार निवडणूक लढवत असून, या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आजीव सदस्यांचा सक्रिय पाठिंबा अपेक्षित असल्याचे आवाहन आघाडीने केले आहे.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मतदार सभासदांनी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ च्या उमेदवारांना मतदान करावे. तसेच दि. १२ मार्च २०२६ पर्यंत पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सर्व सभासदांनी आपल्या मतपत्रिका पोस्टद्वारे किंव्हा प्रत्यक्ष उपस्थित राहून जमा कराव्यात. असे आवाहन ‘साहित्य संवर्धन आघाडी’ च्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
25.1 ° C
25.1 °
25.1 °
33 %
4.1kmh
0 %
Sat
25 °
Sun
29 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
30 °

Most Popular

Recent Comments