मुंबई : राज्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस गाळप हंगाम २०२५-२६ हा १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गाळप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री समितीची बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांसाठी प्रति टन ५ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
📌 एफआरपी दर घोषित
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,
- यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के उताऱ्यावर आधारित एफआरपी ३,५५० रुपये प्रति टन असेल.
- मागील हंगामात राज्यातील सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते.
- यामध्ये ९९ सहकारी व १०१ खासगी कारखान्यांचा समावेश होता.
- शेतकऱ्यांना ३१,३०१ कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे.
📌 ९९% हून अधिक एफआरपी अदा
- राज्यात एकूण ९९.०६ टक्के एफआरपी अदा झाली असून, १४८ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- सहवीज प्रकल्पातून २०२४-२५ मध्ये २९८ कोटी युनिट्स वीज निर्यात करून कारखान्यांना १,९७९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले.
- इथेनॉल विक्रीतून ६,३७८ कोटी रुपये उत्पन्न कारखान्यांना प्राप्त झाले.