पुणे : आदिवासी लोकांचे जगणेच कलात्मक असून त्यांची जीवनदृष्टी, कलादृष्टी वेगळी नाही. आदिवासी समूहाअंतर्गत घडणाऱ्या शुद्ध व्यवहाराचा विचार करून चित्रपट, नाट्यनिर्मिती व्हावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
बहुरंग, पुणे आयोजित 18व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज (दि. 20) दिनेशकुमार यशवंत भोईर (पालघर) आणि दत्तात्रय हैबत तिटकारे (खेड) यांचा कलावंत पुरस्कार देऊन तर परमानंद हिरामण तिराणिक (वरोरा-चंद्रपूर) आणि कृष्णा सदाशिव भुसारे (विक्रमगड) यांचा कला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुडलिक केदारी, डॉ. रामकृष्ण पेढेकर, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक ग. श. पंडित मंचावर होते. भगवान बिरसा मुंडा (हिंदी) चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन दिवसीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, आदिवासी समूह हा अल्पसंख्य आहे. त्यांची कला, संस्कृती, जीवनशैली याची ओळख बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समाजासमाजात बंधुता निर्माण होण्यासाठी चित्रपट हे माध्यम उत्तम आहे.
आदिवासी चित्रपट, साहित्याला स्वतंत्र पुरस्कार मिळावे : डॉ. कुंडलकि केदारी
आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाविषयी संयोजक डॉ. कुंडलिक केदारी माहिती दिली. चित्रपट पुरस्कारासाठी आदिवासी चित्रपट हा स्वतंत्र विभाग तयार करून क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या नावाने आदिवासी विषयक चित्रपटाला तसेच साहित्यिक विषयांची सरमिसळ न करता डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने साहित्याला स्वतंत्र पुरस्कार राज्य शासनातर्फे दिले जावेत, अशी मागणी डॉ. कुंडलिक केदारी यांनी केली.
पुरस्कार निवड समितीतील सदस्य ग. शा. पंडित, डॉ. रामकृष्ण पेढेकर, दिनेशकुमार भोईर, कविता आबनावे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण देशमुख यांनी केले तर आभार धीरज केदारी यांनी मानले.