पुणे, : थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातील शाश्वत औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्समध्ये तज्ज्ञ असलेल्या पुण्यातील ‘केएसएच इन्फ्रा’ या अग्रगण्य विकासक कंपनीने दक्षिण भारतातील पहिले औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी सुमारे रु. ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. कर्नाटक सीमा आणि बंगळुरू बाजारपेठेपासून जवळ असलेल्या तमिळनाडूतील होसूर येथील हा मोठा प्रकल्प सुमारे ५० एकर क्षेत्र व्यापणार आहे. तसेच सुमारे १.२५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाच्या विकासाची क्षमता प्रदान करणार आहे. हा प्रकल्प या भागातील औद्योगिक पायाभूत सुविधांमध्ये एक नवीन मानक प्रस्थापित करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
होसूर-रायकोट्टई मार्गावर नवीन टाटा इलेक्ट्रॉनिक्स फॅसिलिटी केंद्राजवळ वसलेले ‘होसूर औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क’ प्रदेशाच्या औद्योगिक क्षेत्रात एक महत्त्वाचा पाया घडवण्यासाठी सज्ज आहे. या प्रकल्पामुळे १,८०० हून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पुढील ३ ते ४ वर्षांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा शोधणाऱ्या औद्योगिक आणि गोदाम ग्राहकांकडून भरीव पाठिंबा मिळण्याची आशा आहे.
होसूर हा प्रकल्प ‘केएसएच इन्फ्रा’च्या धोरणात्मक विस्ताराचे प्रतीक आहे. कंपनीने पुण्यात सुमारे ४ दशलक्ष चौरस फूट ग्रेड ए औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क विकसित करून एक मजबूत ‘ट्रॅक रेकॉर्ड’ स्थापित केला आहे. या यशस्वी कामगिरीची नोंद करताना कंपनीने तळेगाव आणि चाकण (महाराष्ट्र) येथे ४ औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी रु. १,२०० कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे.
लॉजिस्टिक पार्क भारताच्या रिअल इस्टेट पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग बनत आहेत, ज्यामुळे व्यवसायांच्या खर्चात बचत होईल आणि सेवेतील गुणवत्ताही सुधारली जाईल. हा प्रकल्प ‘के एस एच इन्फ्रा’ च्या शाश्वत विकासाच्या वचनबद्धता, औद्योगिक व लॉजिस्टिक रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पना दर्शवितो,” असे ‘के एस एच इन्फ्रा’ चे व्यवस्थापकीय संचालक रोहित हेगडे यांनी सांगितले.
“पुण्यातील आमच्या प्रस्थापित उपस्थितीचा लाभ घेऊन, आमची मजबूत आर्थिक स्थिती आम्हाला चेन्नई, बंगळुरू आणि मुंबई येथे नवीन संधी शोधण्यास सक्षम करते. या क्षेत्रामधील आम्ही करत असलेले प्रगत टप्प्यातील सौदे हे धोरणात्मक वाढ आणि दीर्घकालीन यशासाठीची आमची समर्पणाचा भूमिका प्रतिबिंबित करतात”, असे त्यांनी पुढे व्यक्त केले.
‘केएसएच इन्फ्रा’चा प्रवास हा ५०हून अधिक वर्ष जुन्या ‘केएसएच ग्रुप’ च्या वारसाचा एक भाग आहे, ज्याला औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क विकास, उत्पादन, ऑटोमोबाईल घटकांचे वितरण, थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स आणि अंतर्देशीय कंटेनर डेपो कार्यसंचालनात रूची आहे. पॅसिफिक सेंच्युरी ग्रुप, मॉर्गन स्टॅनले, मॅपलेट्री आणि इंडोस्पेस यांसारख्या जागतिक खासगी इक्विटी फर्म आणि विकासकांबरोबर यशस्वी भागीदारीचा इतिहास त्यांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
विस्ताराविषयी बोलताना ‘केएसएच इन्फ्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरेसन वैद्यनाथन म्हणाले की,’दक्षिण भारत, विशेषत: तामिळनाडू हे देशाचे प्रमुख औद्योगिक शक्तिस्थान आहे. या राज्याने आर्थिक विकासात लक्षणीय प्रगती केली आहे. सकल देशांतर्गत उत्पादनानुसार तमिळनाडू हे देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत आणि भारतातील सर्वांत जास्त औद्योगिक राज्य असून, विकासासाठीच्या प्रमुख संधीचे ते प्रतिनिधित्व करते.’ ‘वास्तविक औद्योगिक मागणी असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही वाढीची रणनीती बारकाईने तयार केली आहे. आम्ही आमच्या कार्याचा दक्षिणेकडील प्रदेशात विस्तार करत आहोत. तेथे आमच्या प्रकल्पांच्या यशस्वी वितरणावर लक्ष केंद्रित करू. दक्षिणेकडील शहरे महाराष्ट्रात सक्रियपणे संधी शोधून आम्ही आमच्या ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करणाऱ्या उच्च-स्तरीय औद्योगिक पायाभूत सुविधा प्रदान करण्यास सज्ज आहोत.’