पुणे, : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल २०२४ पासून राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा पुणे प्रादेशिक विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त महावितरणला प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजबिल प्राप्तीच्या पावत्या म्हणजेच शून्य वीजबिलांचे वितरण महावितरणकडून करण्यात आले आहे.
राज्यात महावितरणचे राज्यात ४७ लाख ४१ हजार कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. या कृषिपंपांकडून ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट वार्षिक वीजवापर होतो. शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे व अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे व त्याची अंमलबजावणी महावितरणकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचा व त्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान महावितरणला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचे एकूण १३ लाख ७७ हजार १५३ कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. यामध्ये १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपांची क्षमता ७.५ अश्वशक्तीपर्यंत तर १ लाख ५८ हजार १५४ कृषिपंपांची क्षमता त्यापेक्षा जास्त आहे.
योजनेनुसार ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना एप्रिल २०२४ पासून पाच वर्षांपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे.त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख १८ हजार ९९९ कृषिपंपांच्या एप्रिल ते जून २०२४ या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ७५० कोटी ८६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना वीजबिलाची रक्कम प्राप्त झाल्याची पावती वितरीत करण्यात आली आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंत (कंसात एप्रिल ते जूनच्या त्रैमासिक वीजबिलांचा राज्य शासनाकडून करण्यात आलेला भरणा) पुणे जिल्ह्यातील ३ लाख ३० हजार ५४६ कृषिपंपधारकांपैकी २ लाख ८७ हजार ३५५ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना (२३५.७१ कोटी), सातारा जिल्ह्यातील २ लाख १५ हजार २०९ पैकी १ लाख ९९ हजार ३४० शेतकऱ्यांना (७६.४६ कोटी), सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख २ हजार १२ पैकी ३ लाख ४५ हजार ३५४ शेतकऱ्यांना (२६०.६४ कोटी), सांगली जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार १०६ पैकी २ लाख ५० हजार ६३६ शेतकऱ्यांना (१२७.७८ कोटी) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार २८० पैकी १ लाख ३२ हजार १४५ शेतकऱ्यांना (५०.२५ कोटी) मोफत वीज उपलब्ध होणार आहे.