- तीन हजार विद्यार्थी पालकांची उपस्थिती
पुणे : प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांनी सांगितलं आहे की माणसाचा जन्म दोनवेळा होतो. पहिला जीवशास्त्रीय जन्म आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याला त्याच्या ध्येयासाठी दूरदृष्टी मिळते तेव्हा तुम्हाला दिसते किवा दिसत नाही त्याचा काही फरक पडत नाही. फरक पडतो तो व्हिजन मुळे. माझ्या मते विना व्हिजन ची जिंदगी ही इंधन विना असलेल्या कार प्रमाणे आहे, जिचा काही अर्थ नाही. संकटे आहेत, स्पीड ब्रेकर आहेत परंतु त्यावर मात करा. जीवनात कोणतेही महान काम उभे करण्यासाठी कष्ट आणि व्हिजन महत्वाचे आहे. जोपर्यंत तुमचे ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत ‘रुक जाना नही’ असा मोलाचा प्रेरणादायी संदेश स्वतः अंध असूनही हातगाडी विक्रेता ते ३५० कोटींची उलाढाल असलेला उद्योग उभा करणारे व ४ वेळा राष्ट्रपती पदक विजेते, प्रसिद्ध उद्योजक डॉ. भावेश भाटीया यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना देत त्यांची आणि पालकांची मने जिंकली.
यशवंत इंस्टिट्यूट तर्फे प्रामुख्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी “विद्यार्थी हिताय,पालक सुखाय!’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सनराईज कँडल्स या उद्योगाच्या माध्यमातून १० हजाराहून अंध, दिव्यांग आणि अनाथांचे जीवन स्वावलंबनातून प्रकाशमान करणारे उद्योजक भाटीया यांनी रविवार, 4 ऑगस्ट रोजी सकाळी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे गुंफले. त्यावेळी व्यासपीठावर यशवंत इंस्टिट्यूटचे संस्थापक संचालक प्रा. शीतलकुमार पाटील, उज्वला शीतलकुमार पाटील, जनसेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद शहा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, HND जैन बोर्डिंगचे अधिष्ठाता सुरेंद्र गांधी, प्रा. प्रमोद नेमाडे उपस्थित होते. यावेळी पाऊस चालू असतानाही संपूर्ण सभागृह पालक आणि विद्यार्थ्यानी खचाखच भरून गेले होते. यावेळी शहरातील विविध अंध शाळांमधील दिव्यांग विद्यार्थिही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उद्योजक भाटीया यांनी त्यांच्या बुलंद आवाजात प्रेरणादायी भाषण करताना विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही प्रेरित केले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनातील खर्याखुर्या प्रसंगांचे उदाहरणे देत, विनोद करत तसेच थोर विचारवंतांचे प्रेरणादायी विचारपंक्ति उधृत करत भाषणात चैतन्य आणले. यशवंत इंस्टिट्यूट चे कौतुक व्यक्त करत भाटीया म्हणाले की जीवनात संकटे आल्यावर एक तो हम बिखर जाते हैं या निखर जाते है. लेकीन हमे बिखर नही तो निखर जाना है, उडान पंखो से नही हौसलो से होती है’ असाही संदेश दिला.
आजची पिढी मोबाइल, रिल्स, गेम च्या आहारी गेलेली आहे. त्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना परावृत्त होण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सोशल मीडियावर वेळ न घालवता तो सत्कारणी लावा. त्यापासून तुम्हाला काही मिळणार तर नाही उलट तुमचे नुकसान होईल. तुम्हाला नशा करायची आहे तर ध्यासाची करा, ध्येयप्राप्तीची करा. त्यासाठी उद्योजक भाटीया यांनी प्रतिकूल परिस्थितीमधून एका हातगाडीपासून साडेतीनशे कोटींची उलाढाल असलेला मेणबत्ती तयार करण्याच्या उद्योग कसं उभा केला हे देखील संगितले. तसेच हा जमाना स्टार्ट अप चा असून तुम्ही नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे बना हा संदेश देखील दिला.
यावेळी श्री. शीतल पाटील यांनीही प्रास्ताविक करताना विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी “विद्यार्थी हिताय,पालक सुखाय!’ या व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हटले की, पुण्यात प्रत्येक क्षेत्रातील व्यासंगी लोकांसाठी वेगवेगळे व्यासपीठ जसे धार्मिक आवड असलेल्यासाठी गणेशोत्सव, खवय्यांसाठी भिमथडी जत्रा, संगीतात रुची असलेल्यांसाठी सवाई गंधर्व असे अनेक उपक्रम आहेत. पण पुणे हे विद्येचे माहेरघर असले तरी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नसल्याने “विद्यार्थी हिताय, पालक सुखाय!” ही व्याख्यानमाला यशवंत इंस्टीट्यूटने सुरू केल्याचे संगितले. तसेच यातून समाजासमोर रोल मॉडेल असलेल्या प्रेरणादायी वक्त्यांना विद्यार्थ्यांना थेट भेतवून त्यांना पुस्तकी ज्ञानाबाहेरचे व्यावहारिक ज्ञान देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले. आभार प्रा. हर्षवर्धन पाटील यांनी मानले.