पुणे : आज पर्यंत अशी समजूत होती की, मीरगड म्हणजे सध्याचा पेण तालुक्यातील सोनगिरी चा किल्ला आहे. परंतु पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्रांतून ही बाब उजेडात आली आहे की, सोनगिरी आणि मीरगड हे दोन वेगळे किल्ले आहेत. मृगगड उर्फ मीरगड हा किल्ला सरसगड पाली तालुक्यात होता. हे दोन्ही किल्ले वेगळे आहेत हे दर्शवणारी कागदपत्रे पुणे पुरा लेखागारात असंख्य प्रमाणात असल्याचे इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी सांगितले.
भारतीय विचार साधना सभागृह येथे झालेल्या शोध निबंध सभेत राज मेमाणे यांनी त्यांचे संशोधन मांडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे, नाना फडणवीस यांचे वंशज अशोक फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज मेमाणे यांनी विविध कागदपत्रे, किल्लांचे छायाचित्रांचे सादरीकरण करून माहिती दिली.
राज मेमाणे म्हणाले, पुणे पुरालेखागारातील मोडी कागदपत्रांतून या दोन्ही किल्ल्यांचा सर्वात जुना उल्लेख इसवी सन १७३९ च्या कागदातून दिसतो. पुढे १७३९ ते १७९२ या काळात हे दोन्ही किल्ले ओस पडले. त्यानंतर अवचित गड तालुक्यात हबशींचा उपद्रव व्हायला लागल्याने हे दोन्ही किल्ले पुन्हा वसवावे असे अवचितगडचे मामलेदार सरदार बाबुराव पासलकर यांनी पेशव्यांना कळवले. मग पेशव्यांच्या आज्ञेवरून हे दोन्ही किल्ले इसवी सन १७९३ च्या चैत्र मासात नव्याने वसवले गेले. या दोन्ही किल्ल्यांच्या बांधकामाच्या कागदांतून त्यांचा इतिहास समोर आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय इसवी सन १७८० साली मलंगगडावरील इंग्रज विरुद्ध मराठे या लढाईचे अप्रकाशित तपशील मांडताना राज मेमाणे म्हणाले, भर पावसाळ्यात झालेल्या या लढाईत किल्ल्याचे सरनौबत बहिर्जी नाईक पवार यांनी मोठा पराक्रम केला. इंग्रज सैन्य माचीवर चढून किल्ला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले असताना बहिर्जी नाईक पवार यांनी जीवाची पर्वा न करता इंग्रज सैन्यावर मोठमोठे दगड धोंडे फेकून सुमारे ३०० इंग्रजांना जखमी केले. त्यामुळे इंग्रजांचा हल्ला मोडून गड सुरक्षित राहिला. इंग्रजांना माघार घ्यावी लागली, अशी माहिती देखील त्यांनी शोधनिबंधात सादर केली.