पुणे, – : भारतातील औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य स्टार्टअप असलेल्या हेबरच्या पुण्यातील नवीन एआय ग्रीन केमिस्ट्री लॅबचे आज उद्घाटन झाले. शाश्वत व पर्यावरणाला अनुकूल अशा औद्योगिक रसायनशास्त्रातील प्रयोगशीलतेला वेग देणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेते आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. ही एक प्रगत सुविधा असून त्याद्वारे एआय-चालित (कृत्रिम बुद्धिमत्ता) रसायनशास्त्र विकासात कंपनीच्या कार्याचा विस्तार झाला आहे.
या सुविधेच्या केंद्रस्थानी एक एकात्मिक पायलट प्लँट आहे. नियंत्रित वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणातील उत्पादन प्रक्रियेची प्रतिकृती निर्माण करणे या प्लँटमुळे शक्य होणार आहे. या क्षमतेमुळे हेबरच्या शास्त्रज्ञांना एखादे फॉर्म्युलेशन बाजारपेठेत सादर होण्यापूर्वी त्याची चाचणी करणे, प्रमाणीकरण करणे आणि त्यात सुधारणा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जोखीम कमी होईल आणि प्रयोगशाळा व औद्योगिक पातळीवरील उत्पादन या दरम्यानची विस्ताराची कार्यक्षमता वाढते. नव्या पिढीचे संशोधन आणि विकास केंद्र म्हणून या केंद्राची रचना करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये लगदा, कागद, पॅकेजिंग, टिश्यू आणि वॉटर ट्रीटमेंट यांच्यासह प्रमुख उद्योगांसाठी नवीनतम ग्रीन केमिस्ट्री फॉर्म्युलेशन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.
या सुविधेविषयी बोलताना हेबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विपिन राघवन म्हणाले, हेबरमध्ये नाविन्यपूर्णता नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. या नवीन एआय-चालित प्रयोगशाळा आणि पायलट प्लँटमुळे आम्ही एखाद्या उत्पादनाच्या संकल्पनेपासून व्यावसायिक वापरापर्यंतचा प्रवास कमी करत आहोत. या सुविधेमुळे आमच्या टीमला स्मार्ट केमिस्ट्रीजचे वेगाने प्रोटोटाईप निर्माण करण्याची, जोखीम कमी करण्याची आणि उद्योगांना कार्यक्षमता सुधारणारी उत्पादने पुरविण्याची, कचरा कमी करण्याची आणि पूर्वीपेक्षा वेगवान शाश्वत पद्धतींचा विस्तार करण्याची क्षमता मिळणार आहे.”
यावेळी हेबरच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना रघुनाथ ए. माशेलकर म्हणाले, “या टीममध्ये मला दिसणारी ऊर्जा, कुतूहल आणि धडाका खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आणि जागतिक दर्जाच्या पायलट प्लँटची त्याला जोड देऊन, हेबर केवळ नवीन रसायने तयार करीत नाही, तर नवीन शक्यता निर्माण करीत आहे. जागतिक परिणाम करणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या विकासात भारत जगाचे नेतृत्व कसे करू शकतो हे या प्रयोगशाळेतून दिसून येते.”
या विस्ताराद्वारे, लगदा, कागद, पॅकेजिंग, टिश्यू आणि वॉटर ट्रीटमेंट यासारख्या मुख्य उद्योगांची सेवा करण्याची आपली क्षमता हेबर वाढवत आहे. संशोधन आणि विकासासाठी १ कोटी डॉलरहून अधिक खर्च करण्यासाठी हेबर कटिबद्ध आहे. बहुतांश वेळेस पाण्यावर आधारित आणि रसायनाधारित प्रक्रियांचा समावेश असणाऱ्या क्षेत्रांना एआय-चालित ऑटोमेशनसह स्मार्ट केमिस्ट्रीचा मिलाफ करणाऱ्या हेबरच्या प्रगत उत्पादनांचा लाभ होतो. आजपर्यंत कंपनीच्या उत्पादनांमुळे उद्योगांना ९७,,००० मेगावॅट पेक्षा जास्त ऊर्जा, सुमारे ३० दशलक्ष घनमीटर पाणी आणि ९२,००० टनांहून अधिक उत्सर्जन कमी करणे शक्य झाले आहे. स्मार्ट केमिस्ट्रीची एआयशी सांगड घालण्यामुळे होणाऱ्या परिवर्तनाची क्षमता या कामगिरीमुळे अधोरेखित होते आणि ही नवीन प्रयोगशाळा हा प्रभाव आणखी वाढविण्यास सज्ज आहे.