पुणे: सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाने डॉ. शांतिलाल के. सोमैय्या स्कूल ऑफ आर्ट्स आणि सोमैय्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशनच्या माध्यमातून कला समीक्षा आणि समाज-विज्ञान शाखेत पठडीतील शैक्षणिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी नवे आभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातील मूलगामी ज्ञान मिळावे व जागतिक स्तरावर त्या विषयात झालेले संशोधन व प्रवाहांची ओळख व्हावी, आकादमीक तसेच खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी लागणारी कौशल्ये विकसित करण्याच्या अनुषंगाने आखलेला अभ्यासक्रम आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती—अशा आकर्षक सुविधांचा मेळ घालून, पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वेगाने प्रगती करणाऱ्या आर्थिक व्यवस्थेच्या बरोबरीने दृश्य कला व साहित्यात रस घेणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. विशेषतः दृश्य कला क्षेत्राच्या वाढणाऱ्या व्याप्तीनुसार मुंबई सारख्या महानगरांमध्ये अनेक संस्थांना कलेच्या इतिहासाची जाणीव व त्याची समीक्षा करणाऱ्या तज्ञांची गरज आहे. डॉ. शांतीलाल सोमैय्या स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आर्ट हिस्ट्री आणि व्हिज्युअल स्टडीज या विषयातील पदव्युत्तर स्तरावरील एम.ए. अभ्यासक्रम हा या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आहे. या क्षेत्रात मुंबईतील हा पहिला एमएफए-ट्रॅक उपक्रम आहे. सदर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये दृश्य कला निगडीत मुलभूत कौशल्ये व सांस्कृतिक जाणिवांचा विकास आणि तदनुषंगिक उद्योगक्षेत्रातील संधींची तोंडओळख करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
एम.ए. इन आर्ट हिस्ट्री अँड व्हिज्युअल स्टडीज या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एका समीक्षकाच्या दृष्टीने केवळ भारतीयच नाही तर दक्षिण आशियाई, युरोपीय, अमेरिकन आणि आफ्रिकन कला परंपरेला देखील समजून घेण्यसाठी सज्ज केले जाईल. तसेच, केवळ अभिजात कला प्रकारांपुरतेच मर्यादित न राहता, वेगाने बदलणाऱ्या समकालीन जगातील कला व विशेषतः दृश्य कला निगडीत प्रवाहांची तोंड ओळख करून देण्यात येईल. आंतर विद्याशाखीय अध्ययन पद्धतीच्या अनुषंगाने कलेच्या क्षेत्राचा मानववंशशास्त्र, साहित्य, लिंगाधारित अभ्यास, चिन्हविज्ञान आणि समाजशास्त्र इत्यादी अभ्यासशाखांशी असणाऱ्या परस्पर संबंधांचा देखील धांडोळा घेतला जाईल. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने कला संग्रह आणि संग्रह व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. कला इतिहासकार, समीक्षक, क्युरेटर आणि सांस्कृतिक धोरणकर्ते यांची नवी पिढी घडवण्याच्या कार्यात उपरोल्लिखित पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठ मोलाची भर घालत आहे.
कला लेखक आणि क्युरेटर बनू इच्छिणाऱ्यांसाठी एम.ए. इन रायटिंग अँड आर्ट क्रिटीसिझम हा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. कला व समीक्षा क्षेत्रातील काही सर्वोत्तम व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील काही सर्वोत्तम लेखक, समीक्षक, गॅलरीस्ट, ऑक्शनर्स, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, कवी, भाषांतरकारांकडून अभ्यासक्रमातील काही ठराविक भाग शिकवले जातील. प्रकाशन प्रक्रिया, क्युरेशन आणि संग्रहालय व्यस्थापनाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. विद्यार्थ्यांना आघाडीची संग्रहालये, गॅलरीज आणि माध्यम संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव घेता यासाठी अभ्यासक्रम समन्वयकांकडून प्रयत्न केले जातील. या प्रत्यक्ष अनुभवासोबतच कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच AI ची ओळख, विविध भाषांची व त्यांमधील संबंधांची ओळख आणि भाषांतराचे प्रशिक्षण देखील देण्यात येईल.
दोन्ही अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारक्षमता आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध प्रकारचे सेमिनार्स, नामवंत अभ्यासाकांची व्याख्याने आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जात आहेत. विशेषतः पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांची विषयाची समज पक्की व्हावी म्हणून अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रामध्येच समाज-विज्ञान अभ्यासशाखेतील मुलभूत ग्रंथांचे सखोल वाचन त्यांच्याकडून करवून घेतले जात आहे.
अकादमीक तसेच शासकीय संस्था, खाजगी व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावेत या अनुषंगाने दोन्ही अभ्यासक्रमांची आखणी करताना काळजी घेण्यात आली आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक व माध्यम संस्था, नागरी सेवा, आंतरराष्ट्रीय संबंध, प्रसारमाध्यमे आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यंना करिअर करणे सुलभ होईल.
“डॉ. शांतिलाल के. सोमय्या स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आम्ही कला शिक्षणाकडे परंपरा आणि नाविन्यतेला साधणारा सेतू म्हणून पाहतो. आर्ट हिस्ट्री आणि आर्ट रायटिंग अँड क्रिटिसिझम या विषयातील मास्टर्स अभ्यासक्रमातून आम्ही विद्यार्थ्यांना बहूविध सांस्कृतिक अभिव्यक्तीशी चिकित्सक पद्धतीने जोडले जाण्यासाठी सक्षम करतो. त्याचवेळी त्यांच्यातील विश्लेषणात्मक आणि सर्जनशील कौशल्यांना वृद्धिंगत करतो. भारत आणि भारताबाहेर कला आणि संस्कृतीसंदर्भातील चर्चांना, विचारांना नवे स्वरूप देणारे विचारवंत, लेखक आणि क्युरेटर्स तयार करणे, त्यांची जोपासना करणे, हा आमचा मूळ उद्देश आहे,” असे सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाच्या डॉ. शांतिलाल के. सोमैय्या स्कूल ऑफ आर्टचे संचालक श्री. अभय सरदेसाई म्हणाले.


