कार्यक्रमात वीज आणि नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्र्यांची उपस्थिती; ६६ हून अधिक जेनको, ट्रान्समिशन परवानाधारक आणि डिस्कॉममधील २५० हून अधिक लाईनमनचा सत्कार
पुणे,-: केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सीईए), ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आज नवी दिल्ली येथे टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेडच्या सहकार्याने सहावा ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात आला. देशभरात वीज सेवांचे विश्वासार्ह वितरण सुनिश्चित करण्यासाठी ज्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, अशा लाईनमन आणि ग्राउंड मेंटेनन्स कर्मचाऱ्यांचे अथक समर्पण आणि अमूल्य सेवांची दखल घेण्यासाठी लाईनमन दिवस साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाला भारताचे ऊर्जा आणि नवीन व पुनर्नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते. ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल यांनी बीज भाषण केले. सीईएचे अध्यक्ष श्री. घनश्याम प्रसाद आणि अन्य सदस्य, टाटा पॉवर-डीडीएलचे सीईओ श्री द्विजदास बसक यांच्यासह वरिष्ठ नेते आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठित भागधारक यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात भारतातील ६६ हून अधिक राज्यांच्या तसेच खाजगी क्षेत्रातील वीज वितरण आणि निर्मिती कंपन्यांमधील सुमारे २५० लाईनमन आणि पर्यवेक्षक, तसेच ट्रान्समिशन परवानाधारक सहभागी झाले होते. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करणे, अखंडित वीजपुरवठा राखताना उद्भवणाऱ्या कामकाजात्मक आव्हानांवर चर्चा करणे आणि सहभागींमध्ये सहयोगी शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच सुरक्षितता पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी यातून व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले.
या मेळाव्याला संबोधित करताना श्री. श्रीपाद येसो नाईक म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहादरम्यान साजरा केला जाणारा लाईनमन दिवस हा देशभरात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणाऱ्या वीज क्षेत्रातील आघाडीच्या कामगारांच्या समर्पणाला दाद देण्याकरिता आहे.कामाच्या ठिकाणी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा सातत्याने वापर, देखभालीचे काम करण्यापूर्वी योग्य शटडाउनची पुष्टी आणि नियमित क्षमता बांधणी व प्रशिक्षण पुरवून सुरक्षा संस्कृती मजबूत करण्याची गरज यावर त्यांनी भर दिला.
स्मार्ट ग्रिड्स, रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम, एआय-सक्षम प्रेडिक्टिव मेंटेनन्स आणि ड्रोन-आधारित तपासणी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने संभाव्य दोष अगोदरच ओळखण्यास आणि फील्ड कर्मचाऱ्यांना होणारा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते यावर त्यांनी भर दिला. ‘सेवा, सुरक्षा, स्वाभिमान’ ही सहाव्या लाईनमन दिवसाची संकल्पना असल्याचे नमूद करून ते म्हणाले की वीज क्षेत्रातील आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेची भावना त्यात प्रतिबिंबित झाली आहे.
लाईनमन हे वीज क्षेत्रातील योद्धे असल्याचा उल्लेख करून ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल यांनी कठोर हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये, जेव्हा लोक घरात असतात, तेव्हा लाईनमन वीज पुन्हा सुरू करण्यासाठी वीजपुरवठा सतत सुरू राहावा यासाठी बाहेर पडतात याकडे लक्ष वेधले. या क्षेत्रात स्वयंचलितता (ऑटोमेशन) वाढत असले तरी जमिनीवर असलेले लाईनमनच शेवटी यंत्रणा पूर्ववत करतात आणि नेटवर्क चालू ठेवतात, हे त्यांनी नमूद केले. सर्व फील्ड कर्मचाऱ्यांना प्रमाणित सुरक्षा किट आणि साधनांनी सुसज्ज केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमात बोलताना सीईएचे अध्यक्ष श्री. घनश्याम प्रसाद यांनी एक लवचिक आणि विश्वासार्ह वीज क्षेत्र हे विकसित राष्ट्राचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे हे अधोरेखित केले. तसेच आव्हानात्मक परिस्थितीत अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी काम करणाऱ्या लाईनमनच्या अथक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. देशभरातील युटिलिटीजच्या वाढत्या सहभागामुळे लाईनमन दिवस ही एक देशव्यापी चळवळ बनली आहे. त्यातून राष्ट्र उभारणीत लाईनमनच्या महत्त्वाच्या भूमिकेला मान्यता वाढत असल्याचे दिसून येते, हे त्यांनी नमूद केले. या मान्यतेसोबत आघाडीच्या या कामगारांना अधिक बळकट संरक्षण आणि सक्षमीकरण मिळायला हवे, यावर त्यांनी भर दिला.
या उपक्रमाच्या महत्त्वाबद्दल बोलताना टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेडचे सीईओ श्री. द्विजदास बसक म्हणाले, “’लाईनमन दिवस’ हे आमच्या आघाडीच्या योद्ध्यांना समर्पित असे अद्वितीय व्यासपीठ आहे. त्यातून केवळ त्यांच्या प्रचंड योगदानाचा सन्मान करण्यात येत नाही, तर त्यांचा ध्वनीही वाढविण्यात येतो. त्यामुळे त्यांना त्यांचे अनुभव आणि आव्हाने मांडणे शक्य होते आणि त्यांच्या सुरक्षितता व कल्याणाप्रति आमची सामूहिक वचनबद्धता बळकट होते. एक चिवट वीज क्षेत्र सक्षम आणि सुरक्षित आघाडीच्या कामगारांपासून सुरू होते, असा टाटा पॉवर-डीडीएलमधील आमचा ठाम विश्वास आहे.”


