सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी व-हाडी मंडळी आणि लग्नासाठीची सुरू असणारी गडबड.. अक्षता वाटण्याची लगबग… देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी आणि संसारासाठी आवश्यक वस्तूंनी सजलेले रुखवत… हा ह्रद्य लग्नसोहळा अनुभवण्यासाठी आणि वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून जमलेले मान्यवर अशा आनंदी आणि मंगलमय वातावरणात दृष्टीहीन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या दोन अंध मुला – मुलींचा अनोखा विवाह सोहळा झाला. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, मंडळाचे शिरीष मोहिते, सचिन ससाणे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतील ही जोडपी आहेत. रायगडच्या गणेश मौर्य याचा विवाह सांगलीच्या स्वाती चव्हाण तिच्याशी झाला. तर अहमदनगरच्या वैभव ढवळे याचा विवाह पुण्याच्या प्रीती अग्रवाल हिच्याशी झाला.
सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. मयूर ब्रास बँड वरातीमध्ये सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.