विजेची निर्मिती व त्यानंतर पारेषण, वितरण अशा तीन टप्प्यांत ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम डोंगरदऱ्यांतील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना २४ तास दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. त्यामुळे वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे.
आपत्ती निवारणाच्या कामामध्ये ‘प्रकाशाचे नाते’ अखंडित ठेवण्याची जबाबदारी महावितरणसाठी अधिकच खडतर असते. संततधार व मुसळधार पाऊस, पूरस्थिती, वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावरील वीज वितरण यंत्रणेला सर्वप्रथम फटका बसतो. वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याची स्वाभाविक अपेक्षा व्यक्त केली जाते. कारण सर्व काही आता विजेवर अवलंबून आहे. शुद्ध पाण्यासाठी विविध पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय सेवेसाठी छोटी मोठी रुग्णालये, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ठिकठिकाणचे तात्पुरते पुनर्वसन केंद्र, मोठमोठ्या सोसायट्या आदी अत्यावश्यक ठिकाणी वीजपुरवठ्याअभावी अडचणी येऊ शकतात.
ही एक बाब अत्यंत खरी आहे की, कोणत्याही कारणामुळे वीजपुरवठा खंडित होणे हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे तेवढचे विद्युत अभियंते व जनमित्रांना देखील नकोसे आहे. वीजपुरवठा खंडित झाला की बिघाड शोधण्याचे काम त्वरेने सुरू होते. सर्वप्रथम पर्यायी यंत्रणेनेतून वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करावी लागते. मात्र हा पर्याय उपलब्ध नसल्यास तातडीने दुरुस्तीच्या कामांना वेग द्यावा लागतो. त्यासाठी वेळी अवेळी धावपळ होते. नियोजित कामे बाजूला सारून सर्वप्रथम वीजपुरवठा सुरु करण्यास युद्धपातळीवर कामे करावी लागतात. त्यातही अडथळे येत नाही, असेही नाही. एकीकडे तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान आणि दुसरीकडे विजेविना असलेल्या वीजग्राहकांचा त्रागा, रोष अशा दुहेरी अडचणींमध्ये महावितरणच्या अभियंता व जनमित्रांना कामे करावी लागतात. सोबतच वीजसुरक्षेत थोडी जरी अनावधानाने गफलत झाली तर जिवावर बेतणारा विद्युत अपघात घडण्याची शक्यता असते.
वीजयंत्रणेचा पसारा – अदृश्य असलेल्या विजेची ताकद प्रचंड आहे. विजेचे एक बटण दाबले की छोट्याशा बल्बपासून ते कारखान्यातील अजस्त्र यंत्रणा कार्यान्वित होते. मात्र या विजेच्या एका बटणामागे फिडर पिलर, वितरण रोहित्र, ११ केव्ही, २२ केव्ही किंवा ३३ केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या आहेत. या वाहिन्यांसाठी तेवढ्याच क्षमतेचे उपकेंद्रे आहेत आणि या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या पुन्हा उच्चदाबाच्या वीजवाहिन्या आहेत. अशी ही महावितरणची वितरण यंत्रणा आहे. या यंत्रणेला महापारेषणच्या ४००/ २२०/ १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या टॉवर लाईनद्वारे व उपकेंद्रांकडून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे वितरणसोबतच पारेषण यंत्रणेचाही भलामोठा पसारा आहे.
वीजयंत्रणेवर परिणाम – दुर्गम, अतिदुर्गम दऱ्याडोंगरातून थेट ग्राहकांच्या दारी वीज नेणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वितरण यंत्रणेवर नैसर्गिक म्हणजे वादळ, पाऊस, तापलेल्या उन्हाळ्याचाही परिणाम होतो. उन्हाळ्यात विजेची प्रचंड मागणी वाढते. ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी यंत्रणेवर ताण येतो. त्याचाही तापलेल्या वीजयंत्रणेवर परिणाम होतो. प्रामुख्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. विविध संस्थांकडून होणाऱ्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांना क्षती पोहोचल्याचे परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा क्रॉन्क्रिटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच रस्त्याची उंची वाढवल्यामुळे कडेला असलेले फिडर पीलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. यासोबतच वीज यंत्रणेवर किंवा सर्व्हीस वायरवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे आदींमुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व ओला कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडतात. महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कंपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात. वीजयंत्रणेच्या ते संपर्कात आल्यावर शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे एक गोष्ट खरी की वीजपुरवठा खंडित होण्याची बहुतांश कारणे महावितरणच्या नियंत्रणाबाहेरची आहेत.
अविश्रांत दुरुस्ती काम- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीजपुरवठा कधी पूर्ववत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा असते. मात्र अत्यंत खडतर परिस्थितीत भर पावसात व रात्री देखील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंता, कर्मचारी राबत असतात. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्राथमिक चाचणी घेतली जाते. त्यामधून वीज सुरळीत झाली नाही तर लगेच पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु केला जातो. पर्यायी व्यवस्था नसल्यास दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जॉईंट देणे तसेच उपरी वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्यास ती बाजूला करणे, नवीन वीज तार टाकणे, पीन किंवा डिस्क इन्सूलेटर बदलणे आदी कामे करावी लागतात. ही कामे तापलेला उन्हाळा असो किंवा पावसाळ्यातील दऱ्याडोंगरातील निसरडे पायवाटा, दलदल, चिखल, पुराचे पाणी अशा अत्यंत खडतर व प्रतिकूल परिस्थितीत जनमित्रांना दुरुस्तीचे कामे करावी लागतात. कधी बोटीने कधी पोहत जाऊन सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद करावा लागतो किंवा सुरू करावा लागतो.
खरे पाहता महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीजबिलांची वसूली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्वाची कामे करावी लागतात. दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण या प्रतीक्षाकाळात महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना कोणत्या परिस्थितीत व विविध अडथळ्यांना तोंड देत रात्री बेरात्री कामे करावी लागतात याची माहिती फारशी कोणाला नसते. परंतु खडतर परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड व अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर या प्रकाशदूतांच्या कर्तव्यतत्परतेला न्याय दिल्यासारखे होईल.
– निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण पुणे