34.5 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeविश्लेषणवीजबचत; अशी करा तजवीज

वीजबचत; अशी करा तजवीज

वीज ही मूलभूत झालेली आहे. दैनंदिन कामे किंवा एकूणच जीवनमान हे विजेवरच अवलंबून आहे अशी स्थिती आहे. विजेची गरज वाढल्याने स्वाभाविकच वीज वापर वाढत आहे. साधारणतः उन्हाळ्यात विजेचा वापर सर्वाधिक होतो. परिणामी वीज बिलांची रक्कम वाढत जाते. तथापि, विजेचा अनावश्यक वापर टाळून किंवा काही सोपे व साधे उपाय करून केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर आपण विजेची व पर्यायाने आर्थिक बचत करू शकतो. घरामध्ये आवश्यक अनेक उपकरणांना वीज आवश्यक असली तरी ते योग्यप्रकारे वापरले तर वीज बचत होऊ शकते.

वीजबिलात वाढ करणारे उपकरणे– घरातील पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वॉशिंग मशीन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव ओवन, ज्यूसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, संगणक, चार्जर, व्हॅक्यूम क्लिनर अशा उपकरणांचा समावेश होतो. ही उपकरणे वीज बचतीच्या जाणीवेने वापरली तर वीज बचतीला निश्चितच मोठा वाव आहे अन् उपायही खूपच साधे आहेत.

एअर कंडिशनरवर नियंत्रण– सर्वाधिक वीज लागणारे उपकरण म्हणजे एअर कंडिशनर आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यात एसीचा मोठा वाटा आहे. या एसीला पंख्यापेक्षा नऊ पट अधिक वीज लागते. त्यामुळे आवश्यकतेनुसार एसी वापरता येईल. एसीचे नियमितपणे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरु असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. एसी वापरायचा असल्यास गारवा निर्माण झाला की एसी बंद करावा व त्यावेळी शक्यतो पंखाच वापरावा.

रेफ्रिजरेटर– घरात वर्षभर जेवढी वीज वापरलेली असते त्यात सुमारे २५-३० टक्के वाटा हा फक्त एकट्या रेफ्रिजरेटरचा असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात फ्रिजचा दरवाजा सतत उघडावा लागला तर आतील तापमान वाढत जाते आणि शीतकरणासाठी विजेचा वापर जास्त होतो. त्यामुळे फ्रिजमधून एकामागे एक भाजी किंवा पदार्थ काढण्याऐवजी आवश्यक भाज्या किंवा पदार्थ एकाच वेळी काढावेत. सतत फ्रिजचे दरवाजे उघडल्यास विजेचा वापर वाढतो.

एलईडी बल्बचा वापर- घरातील ४० किंवा ६० वॅटचे जुने पारंपरिक विजेचे दिवे (बल्ब) व ट्यूबलाईट त्वरीत बदलून त्याठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी बल्ब लावण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एलईडी (लाईट एमिटिंग डायोडस्) हे कमीत कमी वीज खर्च करणारे बल्ब आहेत. पारंपरिक विजेच्या बल्बचे आयुष्य सुमारे ५ हजार तास असते. याउलट एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते. सोबतच एलईडी बल्ब वापरल्यास ४० किंवा ६० वॅट क्षमतेच्या बल्ब व ट्यूबलाईट्च्या तुलनेत सुमारे ८० टक्के वीजबचत होऊ शकते. घरातील बाथरूम किंवा बेडरूमध्ये ‘झिरो’ बल्बचा पूर्वीपासूनच वापर होत आहे. हा ‘झिरो’ म्हणजे पारंपरिक बल्ब तब्बल १५ वॅटचा असतो. त्यामुळे या बल्बऐवजी आता कमी वॅटचे एलईडीचे बल्ब लावता येईल. बाजारात एक वॅट, तीन वॅटमध्ये देखील एलईडी बल्ब उपलब्ध आहेत.

उपकरणे ‘अनप्लग’ करा– उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाच्या तडाख्यामुळे बहुतांश वेळ हा घरातच घालवला जातो. त्यामुळे टिव्ही, संगणक किंवा मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गेम्स किंवा चित्रपटांसाठी जादा वेळ सुरु राहतात. संगणक किंवा मोबाईलच्या चार्जिंगचा वेळ वाढतो. घरातील लहानथोरांच्या मनोरंजनासाठी सध्या हे उपकरणे महत्वाचे आहेत. मात्र ज्यावेळी हे सर्व उपकरणे वापरात नसतील तेव्हा ते बंद करताना अनप्लग करणे महत्त्वाचे आहे. वापरात नसतानाही टीव्ही, संगणक आणि चार्जर किंवा अन्य उपकरणे स्टॅण्डबायवर असल्यास वीज वापरतात. त्यामुळे ही उपकरणे स्टॅण्डबायवर ठेवू नका तर ती अनप्लग करणे वीज बचतीसाठी आवश्यक आहे.

सूर्यप्रकाशाचा वापर- विजेच्या बचतीसाठी भरपूर असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे आहे. सूर्यप्रकाशाचा घरात कसा वापर करता येईल यासाठी उपाययोजना करता येतात. घराची सजावट व खिडक्यांची पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विविध विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे. यातही महत्वाचा पंखा आहे. ज्या उपकरणांमध्ये कॉईलचा वापर केला जातो ते सर्वच उपकरणे वीज अधिक खातात. त्यात विजेचा पंखा आघाडीवर आहे. त्यामुळे पंख्याला गरज नसताना विश्रांती देणे वीज बचतीसाठी योग्य ठरते.

इतर काही उपकरणे- मायक्रोवेवमधील पदार्थ तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वारंवार दार उघडले की प्रत्येक वेळी सुमारे २५ अंश सेल्सिअस तापमान खाली येते व तेवढेच तापमान वाढायला अधिकची वीज खर्च होते. सिलिंग पंख्यासाठी पारंपरिक रेग्युलेटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरलेला बरा. योग्य प्रमाणात कपडे धुण्याची पावडर वापरून वाशिंग मशीन तसेच ओव्हनमध्ये टायमरचा वापर केल्यास अधिक खर्च होणारी वीज नियंत्रणात राहते. आंघोळीसाठी गरम पाणी लागत असल्यास आंघोळ होईपर्यंत गिझर सुरु ठेवणे हे वीज खर्चाचे आणखी एक कारण आहे. त्यापेक्षा गरम झालेले पाणी एकदाच बादलीत घेऊन गिझर बंद करणे योग्य. सद्यस्थितीत वेगवेगळी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये कमीत कमी चार एनर्जी स्टार असलेले उपकरणे खरेदी केल्यास ५० टक्के विजेच्या बचतीची संधी आहे.

मोफत वीज व वीज उत्पादक होण्याची संधी- घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. छतावरील सौर प्रकल्पांतून वीजग्राहकांच्या गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेते व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

 निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
34.5 ° C
34.5 °
34.5 °
54 %
1.6kmh
61 %
Sat
34 °
Sun
38 °
Mon
31 °
Tue
37 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!