पुणे : येथील राजा रवि वर्मा कलादालनात रोमार्टिका आर्ट डिकोडेड तर्फे आयोजित एक सामूहिक चित्रकला प्रदर्शन १४ ते १९ मे २०२४ ह्या दरम्यान भरणार असून ते तेथे रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ ह्या वेळेत सर्वांना विनामूल्य बघता येईल. ह्या चित्रप्रदर्शनात १९ गुणवान व प्रतिभावंत असे कलाकार सहभागी होणार असून त्यांची विविध माध्यमातील व तंत्रशुद्ध शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रे सर्वांना बघता येतील. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन नामवंत चित्रकार प्रकाश आंबेगावकर, झेन व्हार्टन आणि सुप्रसिद्ध लेखक साईकत बक्षी ह्यांच्या हस्ते झाले असून त्यावेळी अनेक कलाप्रेमी रसिक व संग्राहक उपस्थित होते. “आर्ट बियोन्ड कॅनवास” तर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ह्या प्रदर्शनात सहभागी होणारे कलाकार –
अलका सिंग, अर्पिता व्यास, पोलामी जगताप, जिबान कृष्णा ठाकूर, रेशमा वल्लीपण, अंजली एम. प्रसाद, प्रीति आनंद, क्रांती देसाई, ऋषी बक्षी, झारा अन्सारी, ब्रिंदा निलेश, कविता तांबोळकर निलांजना रॉय, गीतांजली सेनगुप्ता, सुलोचना गावडे, ईना सैनी, शिप्रा पित्रे, साईकत बक्षी, शगुन लाठी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.
सुविख्यात कलाकार शरद तरडे व सूचिता तरडे हे प्रदर्शनात सहभागी कलाकारांशी संवाद साधून त्यांच्या चित्रकलेसंबंधी व तंत्रशुद्ध शैलीत चित्रांची मांडणी, त्यातील आशय व संकल्पना ह्यासंबंधी, सर्व रसिकजनांना योग्य विवेचन व तपशीलवार माहिती देतील.
ह्या विविध चित्रकारांनी काढलेल्या वेगवेगळ्या माध्यमातील चित्रांमधून संवेदनशील व्यक्तीच्या भावना व त्यातील अनेक पैलू, मूर्त – अमूर्त शैलीतील निसर्गचित्रे आणि त्यातील वैविध्य प्राचीन काळातील दगडांपासून बनविलेली ऐतिहासिक रूढी व परंपरा दर्शविणारी चित्रे, वैचारिक प्रगल्भता व संकल्पना दाखविणारी विविधांगी चित्रे, पेन व इंक मधून साकारलेली वैचारिक आशयघन चित्रे वगैरेची सर्व रसिकांना व कलाप्रेमी तसेच कला संग्राहकांना अनुभूती होईल.