पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी (दि.२७) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत उत्सुकता लागलेली आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या २७ मे पर्यंत इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य मंडळाने २७ मे रोजी निकाल जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे.यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. यंदा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे बंधन घालण्यात आल्यामुळेच निकाल लवकर जाहीर होत आहे.पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.