पुणे- विद्यापीठांतर्गत स्वायत्त आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी प्रवेशाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. संलग्न महाविद्यालयांमध्ये या वर्षीपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. परंतु, त्याबाबत विद्यापीठाने अद्याप अधिकृत परिपत्रक काढून सूचना न दिल्याने संलग्न महाविद्यालयांमध्ये संभ्रम होता. कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखांचे पारंपरिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदापासून चार वर्षे पदवी अभ्यासक्रम राबविण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अखेर स्वतंत्र परिपत्रक काढून स्पष्टता दिली आहे.त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पारंपरिक पदवी अभ्यासक्रम हे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) चार वर्षांचे असणार आहेत.
दरम्यान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये यंदापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने पूर्वतयारी यापूर्वीच केलेली आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचे पदवी स्तरावरील अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठाशी संलग्नित सर्व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येत आहेत. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थी, पालक आणि सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणू द्यावे, अशी सूचना विद्यापीठाचे उपकुलसचिव स. द. डावखर यांनी नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये यावर्षीपासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्याची सूचना विद्यापीठाने दिलेली आहे. एनईपीनुसार संलग्न महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने कशा पद्धतीने राबविण्यात यावा, यासंदर्भात विद्यापीठातर्फे लवकरच सविस्तर मार्गदर्शक सूचना संलग्न महाविद्यालयांना देण्यात येतील,” असे डावखर यांनी बोलताना सांगितले.
* चार वर्षांसाठी असणारे अभ्यासक्रम
विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखा
बी. एस्सी. : भूगोल, जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, इलेक्ट्रॉनिक सायन्स, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन
बी. एस्सी. : इंडस्ट्रिअल मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मेटेनन्स (व्होकेशनल), सायबर ॲण्ड डिजिटल सायन्स, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, डेटा सायन्स, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, स्टॅटिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी स्टडिज, एव्हिएशन, फॅशन डिझाइन, होम सायन्स, नॅनोसायन्स ॲण्ड नॅनो टेक्नॉलॉजी, ॲनिमेशन, रिस्ट्रक्चर पॅटर्न, सीड टेक्नॉलॉजी (व्होकेशनल), डिफेन्स ॲण्ड स्ट्रॅटेजी स्टडिज आणि अन्य.
बी. एस्सी. ब्लेंडेड : अर्थ सायन्स, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
६१ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाग आणि केंद्रांची संख्या
२० – फक्त मुलींसाठी असणारी महाविद्यालये
२२ – संशोधन संस्था
१८५ – मान्यताप्राप्त संस्था
संलग्न महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी ‘एनईपी’नुसार चार वर्षे पदवी अभ्यासक्रम राबविण्याच्या अनुषंगाने विद्यापीठातर्फे विद्याशाखानिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. संलग्न महाविद्यालयांमध्ये एखाद्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला कला किंवा वाणिज्य शाखेतील एखादा विषय घ्यायचा असल्यास, अशा अभ्यासक्रमाची रचना कशी असेल, याबाबत अद्याप स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देणे गरजेचे आहे.
– डॉ. संगीता शिंदे, उपप्राचार्य, सरहद महाविद्यालय (कात्रज)