28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन

ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन

20 जून रोजी बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न होणार

पुणे – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व मुरकुंबी इतिहास उपक्रम या जागतिक किर्तीच्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकाच वेळी सात ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण अशा ग्रंथाचे प्रकाशन येत्या गुरुवारी (20 जून) रोजी सायं. 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमांस लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून तर लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत, अशी माहिती भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, इतिहास संशोधक ग. उ. थिटे, पांडुरंग बलकवडे आणि या ग्रंथांचे लेखक, अनुवादक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना रावत म्हणाले की, प्रदीर्घ संशोधनातून या सर्व ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सातही ग्रंथ इतिहासाचा अभ्यास करणार्यांना, संशोधकांना तसेच सर्वसामान्यांही अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचा राज्याभिषेक हा आपल्या सर्वांचा अभिमानाचा विषय आहे. आनंदनाम संवत्सर, शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (6 जून 1674) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. या समारंभाचे औचित्य साधून उपरोक्त चार संस्थांच्या वतीने या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे.

या प्रकाशन समारंभात प्रकाशित होणारे ग्रंथ पुढीलप्रमाणे – (1) कवींद्र परमानंद रचित शिवभारतम्चा इंग्रजी अनुवाद (अनुवादक – सोनिया खरे व डॉ जयश्री साठे) कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभला होता. महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी शिवभारत या ग्रंथाची रचना केली. त्याचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित होत आहे. (2) गागाभट्टविरचीत शिवराजाभिषेक प्रयोग: चिकीत्सक आवृत्ती (संशोधिका – डॉ. जयश्री साठे) या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकविधितील महत्वपूर्ण विधि त्यातील आराधन मंत्र यावर प्रकाश टाकणारा उपोद्घात, मूळ संस्कृत प्रयोग ग्रंथाचे चिकित्सक संपादन व मराठी अनुवाद सादर केला आहे. (3) शिवराज्याभिषेक नव्या युगाचा प्रारंभ (लेखक – डॉ. केदार फाळके) या अभ्यासपूर्ण ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाची आवश्यकता का निर्माण झाली, राज्याभिषेक कसा झाला आणि त्याचे तत्कालीन तसेच दूरगामी परिणाम कोणते झाले याचे विस्तृत विवेचन केले आहे. (4) इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी (1659 ते 1682) – पहिल्यांदा भारत इतिहास संशोधक मंडळाने 1931 मध्ये हा ग्रंथ दोन खंडांमध्ये प्रसिद्ध केला संशोधकांनी ब्रिटिश लायब्ररीत असणार्या ऐतिहासीक कागदपत्रांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असलेले एक हजार निवडक इंग्लिश उतारे शोधून काढले. त्याचे महत्वाच्या छायाचित्रांसह पुनर्मुद्रण पुन्हा होत आहे. (5) बुधभूषण ग्रंथाचा मराठी आणि इंग्रजी अनुवाद (अनुवादक – डॉ मैत्रेयी देशपांडे, प्रा. ग. उ. थिटे, पं. वसंत गाडगीळ) – छत्रपती संभाजी महाराज विरचीत बुधभूषण या ग्रंथामध्ये राज्यव्यवहारासंबंधी विविध श्लोक आहेत. हा ग्रंथ राजा, मंत्री, सेनापती, युद्ध, तह अशा राजशास्त्र विषयक विविध श्लोकांचा संग्रह आहे. (6) ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड 18 व (7) संकीर्ण खंड -19 (संकलक – डॉ अनुराधा कुलकर्णी) या खंडांमध्ये अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील मराठीतील पत्रव्यवहाराच्या नमुन्यांचा संग्रह आहे. यात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावरील पत्रे आहेत. तर 19 व्या खंडामध्ये सावंतवाडीचे सावंत, लक्ष्मेश्वर देसाई यांचे कागद प्रकाशित होत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!