28.6 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeताज्या बातम्याआषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना ...

आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना श्री.विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.



पंढरपूर - पंढरीची पायीवारी ही महाराष्ट्राची प्राचीन, अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड राहण्यासाठी या परंपरेचे रक्षण व संवर्धन करणे हे आपल्या सर्व वारकरी वैष्णवांचे सर्व प्रथम कर्तव्य आहे. हा पायीवारी सोहळा स्वच्छ, निरोगी व निरामय राखण्यासाठी या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यासारखे सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
 आषाढी यात्रेतील सर्व सोहळ्यातील बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा. त्याच प्रमाणे इतर दिंड्यानीही त्याचा आदर्श घेवून या "निर्मल वारी, हरीत वारी अभियान" मध्ये सहभाग घ्यावा. या जाणिवेतून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मार्फत आषाढी यात्रा कालावधीत "श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” सन 2018 पासून सुरू करण्यात आला आहे. 

 आषाढी पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रक्कमेचा (प्रथम रू.1 लक्ष, द्वितीय रू.75 हजार व तृतीय रू.50 हजार) धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, वृक्षमित्र ह.भ.प.शिवाजीराव मोरे या मंदिर समितीच्या तीन सदस्याची समिती गठीत करण्यात आली असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

लाईव्ह दर्शनासाठी यंदा प्रथमच एलईडी व्हॅन 

आषाढी एकादशी बुधवार, दिनांक 17 जुलै रोजी आहे. या यात्रेला अंदाजे 12 ते 15 लाख वारकरी भाविक येतात. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
   दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पंरपंरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, संतांच्या भेटी, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपुजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्थेकामी कर्मचा-यांना प्रशिक्षण, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, स्कायवॉकवर आपत्कालीन गेट व फोनची व्यवस्था, चंद्रभागा नदीपात्रात मुळशी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक 125 सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी, मॅन काउंटिंग मशीन इ. व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यावर्षी पोलिस विभागाकडून अत्याधुनिक पध्दतीच्या DFMD मशिन प्राप्त झाल्या असून, मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या आहेत. यंदा प्रथमच लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन ची व्यवस्था करण्यात आली आहे.
देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती व ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा, चंद्रभागा वाळवंट इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, मंदिर समिती मार्फत प्रथमोपचार केंद्र व भारत सेवाश्रम कलकत्ता व वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांचेमार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व मंदिराच्या माळवदावर भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून येणार आहे. तसेच दर्शनरांगेत आरोग्य विभागामार्फत दर्शनमंडप व पत्राशेड येथे आयसीयु, गोपाळपूर, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत.
 	श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार व्यतिरिक्त श्री संत तुकाराम भवन येथे प्रथमच नवीन स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांगेत एकादशी दिवशी भाविकांना मिनरल वॉटर बॉटल वाटप करण्यात येणार असून, शाबुदाणा / तांदळाची खिचडी व चहा तसेच दासोह रत्न चक्रवती दानेश्वर महाराज श्री. बसवगोपाल नीलमाणिकमठ बंडिगणीमठ, बागलकोट या स्वयंसेवी संस्थेमार्फत पत्राशेड येथे भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
77 %
3.3kmh
37 %
Tue
29 °
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!