पुणे : संगीतात नवनवे प्रयोग करणारे संगीतकार अशी ओळख असणारे पंचमदा. संगीताचे जादूगार आणि संगीत क्षेत्रामध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर अनेक प्रयोग करुन एक काळ गाजविणारे पंचमदा अर्थात आर.डी. बर्मन यांना आपल्या गाण्यांच्या सादरीकरणातून गायकांनी अभिवादन केले. त्यांची अजरामर गीते सादर करुन कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
हटके म्युझिक ग्रुप च्या वतीने संगीतकार आर.डी. बर्मन यांना ८५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी “पंचम’दां ना एक ‘हटके’ अभिवादन” या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये करण्यात आले होते.
कार्यक्रमात पंचम दां (राहुल देव बर्मन) यांच्या लोकप्रिय गाण्यांचे विख्यात वाद्यवृंदांसह सादरीकरण झाले. यात अवधूत जोशी, आनंद घैसास, आनंद गावडे, अशोक देशमुख, दिनेश कर्वे, डॉ.सुनील ताम्हणकर, गौरी तळेगावकर, प्रवीण शेळके, शिरीष कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी, स्वाती सोनसळे, राजश्री तेलकर, वैशाली कुलकर्णी यांनी गायन केले. हे सर्व हटके कलाकार आपापले व्यवसाय आणिक इतर व्यवधाने सांभाळून संगीताची तपश्चर्या करत आहेत.
राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रीत झालेले ‘ओ मेरे दिल के चैन’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘तुम्ही ओ रंगीले कैसा जादू किया’, ‘मुसाफिर हू यारो’, ‘एक मे और एक तू’ ‘ओ हंसिनी’, ‘आनेवाला पल जानेवाला है’ या आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या सादरीकरणांनी श्रोत्यांना गतकाळाची सुरेल सफर घडविली.
पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रुंजी घालतात. कालानुरुप त्यांनी पाश्चात्य धाटणीचे संगीत आणले आणि ते भारतात लोकप्रिय देखील झाले. त्यांच्याबद्दलच्या विविध आठवणी सांगत हटके म्युझिक ग्रुप चे सर्वेसर्वा शिरीष कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत निवेदन करताना कार्यक्रमात रंगत आणली.
आप की कसम चित्रपटातील ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है’, मजरूह सुलतानपुरी लिखित आणि आर.डी.बर्मन यांचे संगीत असलेले ‘बचना ए हसीनो’ या गीताच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात श्रोत्यांनी दाद दिली. ‘तेरे बिना जिया जाये ना’, ‘वादिया तेरा दामन’, ‘पूछो ना यार क्या हुआ’, ‘मेरे नैना सावन भादो’ या गीतांनी रसिकांची मने जिंकली. हटके ग्रुप चे सर्वच कलाकार वाद्यवृंदा मध्ये एकदम झोकून गेले होते आणि त्यांच्या तयारीचे, सांगीतिक प्रगतीचे आणि कौशल्याचे श्रोतृगणाने भरभरून कौतुक केले.