व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे अधिकारी व कर्मचारी परिवारातर्फे तर्फे आयोजन
पुणे : आयटीआयमध्ये पूर्वी अनेक त्रुटी होत्या परंतु आता मेरिट डावलून प्रवेश मिळत नाही, गुणवत्तेवरच प्रवेश मिळतो. काळानुरूप कार्य पद्धती मध्ये बदल आणि सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याच धर्तीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीने बदलासाठी आपण सक्षम व्हायला पाहिजे तरच देश खऱ्या अर्थाने समृद्धीकडे जाईल. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रम समांतर पद्धतीने चालायला पाहिजेत, असे मत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक दिगांबर दळवी यांनी व्यक्त केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागातर्फे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक दिगांबर दळवी यांच्या सेवापुर्ती निमित्ताने कर्मचारी मार्गदर्शन तसेच कार्य गौरव व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सभागृहामध्ये कार्यक्रम झाला. यावेळी व्यवसाय व शिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे ते सहसंचालक रमाकांत भावसार, माजी सहसंचालक यतीन पारगावकर , माजी सह संचालक राजेंद्र घुमे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समिती महाराष्ट्र राज्य चे प्रमुख सल्लागार डॉ. ए.पी. कुलकर्णी, अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य सचिव देविदास राठोड, महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी, निजाम जमादार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उदय सूर्यवंशी तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांच्या समितीने केले.व्यवस्थापन प्रा. विनोद पवार, प्रा आकाश चौधर, प्रा.स्मिता शिर्के यांनी केले.
दिगांबर दळवी म्हणाले, आयटीआय आणि कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी जी मुले येतात ती अत्यंत सामान्य परिस्थितीतील असतात. पालक विश्वासाने या मुलांना आपल्याकडे पाठवतात त्या मुलांना चांगले शिक्षण घेऊन पालकांचा विश्वास सार्थ केला पाहिजे.
देशात सक्तीचे शिक्षण मिळते परंतु शिक्षणासोबत सक्तीची नोकरी देखील मिळाली पाहिजे तरच देशातील व्यवस्था टिकेल. नाहीतर भविष्यात अनेक सामाजिक प्रश्न उभे राहतील.
शासकीय कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, काम करताना आपली दूरदृष्टी विकसित करा म्हणजे चांगले काम होईल. आपल्याला जे काम सोपवलेले आहे ते काम आपण गरीब घरातील मुलांसाठी करतो. त्यांना आशा असते की हे शिक्षण घेतले, तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. काही मुलांकडे प्रवेश घेण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करा.
डॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी यांनी दळवी यांच्या धडाके बाज शैलीचे कौतुक करत त्याच्या कार्याचा व बायफोकल अभ्यासक्रमां बाबत सकारात्मक दृष्टिकोन असल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. रविंद्र शाळू यांनी महाराष्ट्र गीताने केली. व सांगता प्रा. सुनंदा शिंगनाथ यांच्या पसायदानाने झाली. प्राचार्य दत्तू गरदडे, प्रा. संतोष गुरव व प्रा.सुनंदा शिंगनाथ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य भिलेगावकर यांनी आभार व्यक्त केले.