पुणे : युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता पुण्यामध्ये प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने ६ वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ ते १८ आॅगस्ट दरम्यान न-हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात स्पर्धा होणार आहे. वक्तृत्व, भारुड, भजन, पोवाडा, वादविवाद, पथनाटय या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
स्पर्धेचे उद््घाटन शनिवार, दिनांक १७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. उद््घाटनानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार असून भारतीय लोकशाहीचे भवितव्य, राजकारण व युवांचा दृष्टीकोन, चारित्र्यसंपन्न युवा राष्ट्रनिर्माणाला हवा, अंमली पदार्थ आणि युवा पिढी असे विषय आहेत. तर, भारुड/भजन/पोवाडा स्पर्धा देखील याच दिवशी होणार आहे. तसेच स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, वादविवाद व पथनाटय स्पर्धा रविवार, दिनांक १८ आॅगस्ट रोजी सकाळी १० पासून सुरु होणार आहेत. वादविवाद स्पर्धा करीता महाविद्यालयात गणवेशसक्ती हवी की नको? हा विषय असणार आहे. तसेच पथनाटय स्पर्धेकरीता मैत्री पंचमहाभूतांशी या विषयावर सादरीकरण करण्याची मुभा स्पर्धकांना असणार आहे.
सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला १५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणा-या रुपये ११११ व चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभागी होणार असून नोंदणी सुरु आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे.