पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सहावा आदर्श माता पुरस्कार सुशिला चव्हाण, रत्नप्रभा जगताप, प्रतिमा सांकला यांना प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला माहेर संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन, मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनिल चव्हाण यांच्या सुशिला चव्हाण या मातोश्री आहेत. तर, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या रत्नप्रभा जगताप या मातोश्री आहेत. तिस-या पुरस्कारार्थी प्रमिला सांकला या सिद्धीविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री आहेत. विविध क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्वांना घडवून समाजसेवेचे धडे दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून या मातांना गौरविण्यात येणार आहे.
लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. मात्र, त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.