पुणे : आयुष्यात कला आणि क्रीडा या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. कला आणि क्रीडा या गोष्टींमुळे आयुष्य खऱ्याअर्थाने अर्थपूर्ण होते. विद्यार्थी दशेपासून कला-क्रीडा या गोष्टींना महत्त्व दिल्यास मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळू शकतो, असे प्रतिपादन महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांनी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेऊन स्तुत्य उपक्रम राबविला असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
पुणे महानगर पालिका, संवाद, पुणे, वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशन, पुणे, सातारकर स्टुडिओ ऑफ फाईन आर्ट आणि सिने मॉडेल आर्ट स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन, सारसबागेसमोर येथे कलाकार, शिल्पकार, मूर्तीकार, चित्रकार, रांगोळी कलाकार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्या निकेतन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी होऊन गणेशमूर्ती साकारल्याबद्दल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी नंदकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी होते.
संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, चित्रकार व शिल्पकार प्रज्ञा सातारकर, प्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत, विवेक खटावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, शिल्पकार सुप्रिया शिंदे, महेश मोळवडे मंचावर होते.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना प्रज्ञा सातारकर म्हणाल्या, मुलांचे मातीशी नाते जोडले जावे यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे शाळांमध्ये चित्रकलेचे प्रशिक्षण दिले जाते त्याप्रमाणे शिल्पकलेचेही प्रशिक्षण दिले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आजच्या रिल्सच्या काळात समाज मागे पडत असल्याचे सांगून नंदकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले नाही तर त्यांच्या कलेचे मोल शून्य ठरेल. कला, क्रीडा आणि माणुसकीत वाढ होण्यासाठी लोकोपयोगी कार्याला आपले सर्वतोपरी सहकार्य राहिल, असे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले.
मुलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, कला जोपासणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच आहे. मुलांवर केवळ अभ्यासाचे ओझे न टाकता त्यांच्यातील कला कशी फुलेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे मुरली लाहोटी यांनी कौतुक केले.
सुनील महाजन म्हणाले, खासगी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात, पण महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांच्या कला-गुणांना वाव देणारे उपक्रम फारसे होत नाहीत. उपायुक्त नंदकर यांच्या सहकार्यामुळे महापालिकेच्या शाळेमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ते म्हणाले.
सुरेश राऊत, सुप्रिया शिंदे, महेश मळवटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतिन पांडे, स्नेहा बने यांनी केले.