20.1 C
New Delhi
Wednesday, October 29, 2025
Homeमनोरंजनबाप्पाचा आशीर्वाद घेत, 'पाणी'चे टिझर लाँच

बाप्पाचा आशीर्वाद घेत, ‘पाणी’चे टिझर लाँच

चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक आला समोर

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून त्यातील आदिनाथ कोठारेचा लूक समोर आला आहे. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असतानाच चित्रपटाच्या टीमने लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत ‘पाणी’ चित्रपटाचा टिझरही लाँच केला. त्यामुळे एकाच वेळी ‘पाणी’चे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टिझर पाहून हनुमंत केंद्रे या महान व्यक्तीचे आयुष्य जवळून जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे स्वतः साकारणार असून यात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे. ‘पाणी’ची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती आहे, हे सर्वश्रूत आहे. येथील अनेक जण गाव सोडून जात असतानाच हनुमंत केंद्रे या तरुणाने तिथेच राहून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. गावात पाणी नाही म्हणून, त्यांचे लग्नही होत नव्हते. त्यांच्या आयुष्यातील हाच संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टिझरमध्ये त्यांची प्रेमकहाणीही दिसत आहे, आता ती पूर्ण होतेय का, गावात पाणी आणण्यात हनुमंत यांना यश येते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘पाणी’ पाहून मिळणार आहेत.

या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनस म्हणते, ”पर्पल पेबल पिक्चर्सच्या माध्यमातून, आम्हाला अशा कथा घेऊन यायच्या ज्या ऐकण्याची, जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कथा आम्हाला प्रेक्षकांसमोर घेऊन यायच्या आहेत आणि आमचा ‘पाणी’ चित्रपट असाच आहे. हा चित्रपट आमच्यासाठी खास आणि प्रासंगिक आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यापेक्षा चांगली सुरुवात कोणती असू शकते.’’

राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या म्हणतात, ”मराठी प्रेक्षक हे खूप चोखंदळ असतात. त्यामुळे एखादा चांगला विषय घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करावे, या प्रतीक्षेत आम्ही होतो आणि ‘पाणी’च्या माध्यमाने आम्हाला आमचा चित्रपट मिळाला. या निमित्ताने आम्ही पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या दोन नामांकित प्रोडक्शन हाऊससोबत जोडले गेलो. चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज बाप्पाच्या साक्षीने आमचा टिझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचे याला भरभरुन प्रेम मिळत आहे. असेच प्रेम प्रेक्षकांनी चित्रपटावरही करावे.”

दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतो, ”आज चित्रपटातील हनुमंत केंद्रेचा लूक समोर आला असून टिझरही प्रदर्शित झाले आहे. हनुमंत केंद्रे हा चेहरा अवघ्या जगभरात पोहोचला असून त्याचे कर्तृत्व प्रेक्षकांना ‘पाणी’मधून अनुभवता येणार आहे. मला आनंद आहे, की एवढे मोठे व्यक्तिमत्व साकारण्याची संधी मला मिळाली आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
83 %
0kmh
75 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!