26 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeताज्या बातम्यामाझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत

माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

अखिल मंडई मंडळातर्फे गणेशोत्सवात राबणाऱ्या ४०० हून अधिक कष्टकरी हातांचा सन्मान : सन्मान सोहळ्याचे २७ वे वर्ष

पुणे : पुण्यात जेव्हा महामारीची साथ सुरू झाली तेव्हा कष्टकरी कामगारांनी रजा काढल्या नाहीत किंवा पळून गेले नाहीत. ते कामावर हजर राहिले, शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला. कष्टकरी बांधव तोंडावर मास्क ठेऊन कामावर येत होते. माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

अखिल मंडई मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूकीदरम्यान आणि गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवणाऱ्या ४०० हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वंचित आणि उपेक्षितांसाठी संस्था चालविणाऱ्या संस्थाचालकांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विक्रम खन्ना, सुरज थोरात, राजेश कारळे उपस्थित होते. उपरणे, श्रीफळ, शारदा गजाननाची प्रतिमा, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.

डॉ.बाबा आढाव म्हणाले, कष्टकरी वर्गाचा सन्मान करून विधायक काम मंडळ करीत आहे. सत्कार घ्यायला ज्या भगिनी आलेल्या आहेत, मंडईच्या पायाची जमीन सुद्धा त्यांच्या नावाची आहे. कष्टकरी कचरा उचलतात ते महानगर पालिकेचे नोकर नाहीत. काच, प्लास्टिक, लोखंड गोळा करून पुनर्निर्मिती होते आणि त्यातून त्यांच्या पोटाला आधार मिळतो.

हर्षद झोडगे म्हणाले, दरवर्षी सफाई कामगारांचा सन्मान करून सामाजिक भान अखिल मंडई मंडळाच्या वतीने जपले जाते. सामाजिक कार्याला लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी तर्फे नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, यापुढेही मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.

अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात आणि विसर्जन मिरवणुकी नंतर देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण शहर स्वच्छ राहते. कोणतीही रोगराई न पसरण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाला खूप महत्त्व आहे. एक दिवस त्यांनी सफाई केली नाही तर शहराची काय अवस्था होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या कष्टकरी वर्गाच्या कामाचे मोल लक्षात घेऊन मागील २७ वर्षांपासून त्यांचा सन्मान गणेशोत्सवानंतर करण्यात येतो. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26 ° C
26 °
26 °
91 %
4.5kmh
100 %
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
29 °
Sat
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!