दुहेरी सुवर्णपदकासह स्ट्रॉंग वुमन किताब : दक्षिण आफ्रिका येथील कॉमनवेल्थ पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा
पुणे: पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी ५७ किलो एम १ महिला गटामध्ये दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स म्हटला जाणारा ‘बेस्ट लिफ्टर’ म्हणजेच ‘स्ट्राँग वुमन ऑफ कॉमनवेल्थ’ हा मानाचा किताबही त्यांनी पटकावला.
दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे कॉमनवेल्थ पावरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा पार पडल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेल्स, न्यूझीलंड, कॅनडा, साउथ आफ्रिका, श्रीलंका देशांमधील २०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक प्रकारात ७७.५ किलो तर इक्विप्ड प्रकारात ९७.५ किलो वजन उचलले. एकाच दिवशी सकाळी वजन देऊन स्पर्धा खेळून त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा वजन देऊन स्पर्धा खेळणे असे मोठे आव्हान त्यांनी पेलले.
मंगोलिया येथे दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर मलेशिया येथील एशियन चॅम्पियनशिप व आता दक्षिण आफ्रिका येथील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप त्यांनी गाजवली.
गुरुसोबत शिष्याची देखील रजत पदकाची कामगिरी – डॉ. शर्वरी इनामदार यांची शिष्य सुप्रिया पांडुरंग सुपेकर हिने ५२ किलो ज्युनिअर महिला गटामध्ये क्लासिक प्रकारात ५० किलो वजन उचलत चुरशीच्या स्पर्धेत रजत पदकाची कमाई केली. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या यशासाठी या गुरु -शिष्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोघीजणी बिबवेवाडी च्या कोडब्रेकर जिम मध्ये सराव करतात. त्यांना डॉ. वैभव इनामदार, ॲड. रवींद्र कुमार यादव आणि संजय सरदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले.