पुणे- दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायची असल्यास त्या वर्षी त्यांची ७५ टक्के उपस्थिती शाळेत बंधनकारक आहे. सर्व शाळांनी या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे, अशा सूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) दिल्या आहेत. सीबीएसईसीनं आपल्या अखत्यारीतील शाळा, मुख्याध्यापक व संस्था चालकांना या संदर्भात एक नोटीस पाठवली आहे. त्यात उपस्थितीच्या नियमांची आठवण करून देण्यात आली आहे.
शाळा ही केवळ शैक्षणिक शिक्षणाची केंद्रे नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे सर्वश्रुत आहे. विषय ज्ञान देण्याबरोबरच शाळा अतिरिक्त उपक्रम, सह-शिक्षण, चारित्र्य निर्मिती, मूल्ये रुजवणे, टीमवर्क, सहकार्य, विविधतेचा आदर, समावेशन अशा अनेक गोष्टींना चालना देतात. त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती महत्त्वाची आहे, असं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. बोर्डाच्या नियमांनुसार बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. वैद्यकीय आणीबाणी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग आणि इतर गंभीर कारणांसारख्या अत्यावश्यक परिस्थितीत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास बोर्ड केवळ २५ टक्के सूट देते, असं सीबीएसईनं नोटीसमध्ये म्हटलं आहे. उपस्थितीची आवश्यकता आणि त्याचं पालन न केल्यास त्याचे संभाव्य परिणाम याबद्दल विद्यार्थी आणि पालकांना माहिती देण्याचे निर्देश बोर्डानं शाळांना दिले आहेत.