25.8 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
Homeदेश-विदेशशहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता 

शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता 

पुणे -पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेने पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ९०० पंपचालक तसेच सातारा जिल्ह्यातील ५०० पंपचालक सहभागी झाले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले. पंपचालकांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोवर इंधन भरण्यासाठी त्यांचे टँकर पाठविणे बंद केले आहे. यामुळे पंपावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागला असून, इंधन टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोवरून इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये ८५ टक्के पंपचालकांचे तर १५ टक्के खासगी वाहतूकदारांचे आहेत. या बंदमुळे पंपचालकांनी इंधन वाहतुकीसाठी टँकर पाठविणे बंद केले आहे. यामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून, शहरात रात्री अनेक पंपांवरील इंधन साठा संपला. उद्या पुरवठा सुरळीत न झाल्यास इतर पंपांवरील इंधन साठा संपून शहरात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, इंधन वाहतुकीसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अव्यवहार्य दराने निविदा काढल्या जातात. सर्व भागधारकांना विचारात न घेता पेट्रोलियम कंपन्या पावले उचलत आहेत. यामुळे इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात असून, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांना आंदोलनाची सूचना दिली होती. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल पंपांवर योग्य प्रमाणात आणि वेळेवर पोहोचविण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची आहे.

इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे गेल्या दोन वर्षांत इंधन चोरीच्या १० घटनांची नोंद झाली आहे. अशाच इंधन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केली. पेट्रोलियम कंपन्यांकडून चोरी होऊ नये यासाठी मोठा खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाल्याने या चोऱ्या होत आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.

पेट्रोलियम कंपन्यांसोबत सोमवारी झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर मंगळवारी या कंपन्यांकडून चर्चेचे पाऊल उचलण्यात आले नाही. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. इंधन टंचाईमुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास पेट्रोलियम कंपन्या जबाबदार असतील.

ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.8 ° C
25.8 °
25.8 °
87 %
1.9kmh
100 %
Thu
31 °
Fri
33 °
Sat
35 °
Sun
33 °
Mon
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!