28 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमनोरंजनसंवादिनी वादनातून उमटले बंदिशीचे बोल

संवादिनी वादनातून उमटले बंदिशीचे बोल

पुणे : गायकी अंगाने सादर झालेल्या बंदिशी आणि विविध रागांनी परिपूर्ण संवादिनी वादनाने रसिकांची सायंकाळ सुरांच्या वर्षावात चिंब झाली. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे अंतर्गत असलेल्या संवादिनी प्रेमी मंडळातर्फे (सप्रेम) आयोजित संवादिनी वादनाच्या विशेष मैफलीचे.
या मैफलीत गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित राया कोरगावकर आणि बंगळुरू येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित रवींद्र कातोटी यांचे एकल संवादिनी वादन झाले. कार्यक्रमाचे आयोजन गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजक संजय चितळे यांच्यासह गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परीणिता मराठे, विश्वस्त अच्युत मेढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संवादिनी वादन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या मैफलीत आवर्जून उपस्थिती लावली.
मैफलीची सुरुवात राया कोरगावकर यांनी राग गावतीमधील पंडित रामाश्रय झा यांनी रचलेल्या ‌‘आस लागी तुम्हारे चरण‌’ आणि ‌‘हमरी पार करो साई झांझरी नैय्या‌’ या बंदिशी गायकी अंगाने सादर करून केल्या. संवादिनीतून फक्त सुरच नव्हे तर शब्दही उमटतात हे ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर राया कोरगावकर यांनी स्वत: रचना केलेला आडाचौताल रागातील तराणा अतिशय प्रभावीपणे सादर केला. ठुमरी वादनाने कोरगावकर यांनी आपल्या मैफलीची सांगता केली. त्यांना गोवा येथील तुकाराम गोवेकर (तबला), सुनाद कोरगावकर (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित रवींद्र कातोटी यांनी मैफलीची सुरुवात श्याम कल्याण राग ऐकवून केली. रागाचा विस्तार त्यातील बारकावे संवादिनी वादनातून सहजपणे उलगडून दाखवित कातोटी यांनी रसिकांची वाहवा मिळवली. राग जयजयवंतीचे बहारदार सादरीकरण रसिकांना विशेष भावले. पुरंदरदास यांच्या कर्नाटकी रागसंगीतात स्वरबद्ध केलेल्या रचनेचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित स्वरार्थ सादर करून पंडित कातोटी यांनी रसिकांना मोहित केले. पंडित कातोटी यांनी आपल्या मैफलीची सांगता सुरेल भैरवी वादनाने केली. ऋषिकेश जगताप (तबला) तर तेजस कातोटी (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार संजय चितळे, अच्युत मेढेकर यांनी केला. कलाकारांची ओळख व निवेदन पंडित प्रमोद मराठे यांनी केले तर संजय चितळे यांचा सन्मान प्रसिद्ध संवादिनी वादक सुधीर नायक यांनी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28 ° C
28 °
28 °
34 %
2.2kmh
0 %
Fri
28 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!