मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकांच्या घोषणेनंतर आता राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचारसंहितेदरम्यान, मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेला निधी महिला आणि बालकल्याण विभागाने थांबवला आहे. यामुळे पात्र महिलांना योजनेचे पैसे निवडणुकीपर्यंत मिळू शकणार नाहीत. त्यामुळेच राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले आहेत. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरचे पैसे मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
मतदारांना आर्थिक लाभ देऊन थेट प्रभावित करणाऱ्या योजना तातडीने बंद कराव्यात, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व प्रशासकीय विभागांना जारी केल्या आहेत. याशिवाय आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कालिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली. यादरम्यान त्यांना माहिती मिळाली, की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला आणि बालकल्याण विभाग मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत आहे. त्यानंतर या योजनेची माहिती विभागाकडून मागवण्यात आली आहे. लाडकी बहीण या योजनेतील निधीचे वितरण चार दिवसांपूर्वी विभागाने थांबवल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे या योजनेवर तात्पुरता ब्रेक लागला आहे. योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी महिल्यांच्या खात्यात अधिकचे अडीच हजार येणार असल्याची चर्चा होती; मात्र ती बातमी चुकीची होती.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवे अर्ज स्वीकारणेही बंद केले आहे. यामुळे महायुती सरकारच्या या महत्त्वकांक्षी योजनेला तूर्त ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
…………
निधी थांबवला
निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यानुसार, महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिला लाभार्थ्यांना मिळणार नाहीत.