१० वर्षांत काय केले? याचा हिशोबच मांडला
पिंपरी -१० वर्षे गायब असणाऱ्यांना माझ्याविरोधात बोलण्यास एकही मुद्दा नाही. सरसकट शास्तीकर माफीचे विरोधकही लाभार्थी आहेत. त्याची फलक लाऊन माहिती दिली जाईल. विरोधक खोटे बोलत आहेत. खोटेनाटे आरोप करत आहेत. पण, मी खरे बोलणार ते त्यांना लागणार आहे. जेवढे माझ्यावर आरोप करतील तेवढ्याच ताकदीने मी यांच्या विरोधात उभे राहणार आहे. वेळ येऊ द्या, जशाच तसे उत्तर दिले जाईल. सगळ्यांचा नाद करा पण आपला करायचा नाही. खतरनाक पद्धतीने पुराव्यानिशी उत्तर दिले जाईल, असा इशारा देतानाच ‘‘नागेश्वर महाराजांची शपथ… मोशी गावातील एकोपा कायम ठेवणार, असा विश्वासही भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी दिला आहे.
भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- आरपीआयसह मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशीत संवाद मेळावा घेण्यात आला. या सभेला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसेविका सारिका बो-हाडे, माजी नगरेविका अश्विनी जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, 1997 ते 2017 पर्यंत समाविष्ट गावाचा वनवास होता. तो 2017 मध्ये संपला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विकासाची गंगा आली. समाविष्ट गावांचा कायापालट झाला. च-होलीत, मोशीकरांचे भाग्य चांगले असल्याने दोन महापौर मिळाले. पूर्वेला नितीन काळजे आणि पश्चिमेला राहुल जाधव महापौर झाले. दोघेही पूर्वी नगरसेवक होते. परंतु, स्थानिक नेतृत्वामुळे त्यांना काम करण्याची संधी मिळत नव्हती. दडपशाही खाली दबावे लागत होते. आमची कामे होत नव्हती. जनतेला न्याय देऊ शकत नव्हतो. मोठ्या झाडाखाली वाढ होत नव्हती. त्यामुळे 2014 साली विधानसभा निवडणूक अपक्ष लढलो. जनतेने मोठी साथ देत विधानसभेत पाठविले.
**
संतपीठ उभारल्याचे सार्थक झाले…
निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेते असल्यावर शहराचा बाहेर जाऊन निर्णय घ्यावे लागत नाही. त्याची गरज काय आहे, शहरातील समस्या शहरातील नागरिकालाच माहिती असतात. त्या दूर कशा करायच्या हे शहरातील नागरिकालाच ठरवावे लागते. त्यामुळे दहा वर्षे बाहेर जावे लागले नाही. चिखलीत संतपीठ आणले. संतपीठमधील विद्यार्थी रामकृष्ण हरी म्हणून नमस्कार करू लागली. आपला अध्यात्मिक वारसा जोपासू लागले. भोसरी मतदारसंघातील समाविष्ट भागातील पाच गावांसाठी अंद्रा, भामा असखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणले. शास्तीकराचे मानगुटीवरील भूत उतरविले. सभागृहात भांडून 460 कोटी रुपये माफ करून घेतले. यापूर्वीचा आमदार सभागृहात बोलताना कधी पाहिला का?, असा सवालही त्यांनी केला.
विरोधकही माझ्या कामाचे लाभार्थी…
सोसायटीधारकांवर लादलेला उपयोगकर्ता 165 कोटी रुपये शुल्क वसुलीला स्थगिती आम्हीच दिली. प्राधिकरणाच्या 97 हजार मालमत्ता फ्री होल्ड केल्या. शास्तीकराचा लाभ झालेले 80 हजार, कचरा उपयोग कर्ता शुल्क माफ केले. साडे बारा टक्के परतावा भूमिपुत्र शेतकऱ्यांना मिळवून दिला. विरोधकांचीही कामे केली. तेही लाभार्थी आहेत. गावागावात एकोपा टिकवून ठेवला, भांडणे होऊ दिले नाहीत. मोशीतील कचऱ्याचे ढीग कमी केले आणि विरोधक विचारत आहेत दहा वर्षात काय केले, असा घणाघातही आमदार लांडगे यांनी केला.