दीड वर्षांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बालेकिल्ल्यात झालेला पराभव भाजपच्या फारच जिव्हारी लागला होता. तेव्हाच आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला. त्यातच लोकसभा निवडणुकीत कसब्यात भाजपला आघाडी मिळाली. यामुळेच काँग्रेसचे विद्यामान आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात दीड वर्षाने होणाऱ्या लढतीची दुसरी फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. ‘बालेकिल्ला’ अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जनसंपर्क, महाविकास आघाडीतील शिवसेनेची ताकद ही काँग्रेस उमेदवाराची जमेची बाजू असली, तरी बंडखोरीचे दुखणे कायम राहिले आहे. भाजपच्या दृष्टीने बालेकिल्ल्यातील मजबूत संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे या भक्कम बाजू ठरणार आहेत. मात्र, उमेदवाराच्या निवडीवरून असलेली नाराजी भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे. कसबा मतदारसंघातील लढत भाजप-काँग्रेस-मनसे उमेदवारांत तिरंगी होणार असली, तरी खरी लढाई भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. पोटनिवडणुकीप्रमाणेच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यातील सामना अटीतटीचा आहे. पोटनिवडणुकीत रासने यांना बालेकिल्ल्यातच पराभूत व्हावे लागले होते. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व होते. पोटनिवडणुकीत मात्र ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा मुद्दा चर्चेला आला. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दांडगा वैयक्तिक जनसंपर्कही भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता. या अनुभवानंतर भाजपने मतदारसंघात पुन्हा मजबूत बांधणी सुरू केली. त्यानंतरही महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद, भाजप उमेदवाराबाबतची काही प्रमाणात कायम असलेली नाराजी अशी आव्हाने भाजपपुढे आहेत. भाजपमधील बंडखोरी दूर करण्यात नेते देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे, तरीही निवडून येण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
New Delhi
smoke
21.1
°
C
21.1
°
21.1
°
43 %
1.5kmh
3 %
Thu
21
°
Fri
23
°
Sat
18
°
Sun
21
°
Mon
22
°