पंढरपूर -कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे परंपरेनुसार 24 तास दर्शन असते. त्यानुसार दि.04 नोव्हेंबर रोजी श्रीचा पलंग काढून श्री पांडूरंगास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्या देवून 24 तास दर्शन सुरू करण्यात आले होते. या 24 तास दर्शन कालावधीत देव 24 तास उभा असल्याने, मुहुर्त पाहून देवाची विधिवत प्रक्षाळपुजा करून श्रींचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
दि. 20 नोव्हेंबर रोजीच्या मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न झाली. सदर पूजेच्या पूर्वी संपूर्ण मंदिर स्वच्छ धुवून घेण्यात आले. पहाटे नित्यपुजा झाल्यावर देवाच्या मूर्तीस चांदीचे पाऊल लावण्यात आले. त्यावर भाविक लिंबू साखर लावतात. श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला. दुपारी 12.20 ते 12.30 या वेळेत श्री.पांडूरंगास व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पहिले स्नान घालण्यात आले. तसेच दुपारी 2.20 ते 5.30 पर्यंत श्री. पांडूरंगास रूद्राभिषेक अकरा ब्रम्हवृंदामार्फत करण्यात आला. त्यावेळी देवास तेल लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर मुर्ती स्वच्छ करून दुधाचा अभिषेक करण्यात आला व देवाचा पोषाख, अलंकार व महानैवेद्य दाखवून आरती करण्यात आली असून, यात्रेसाठी बंद केलेले काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आले. तसेच रात्रौ शेजारतीच्या वेळी देवाचा शिणवटा घालवण्यासाठी आयुर्वेदिक (विविध वनस्पती, सुकामेवा, सुंठ, काळे मिरे इ.) काढा देवाला दाखविण्यात आला. तसेच दि.21 नोव्हेंबर पासून भाविकांच्या हस्ते होणा-या तुळशी अर्चनपूजा, पाद्यपुजा व नित्यपुजा देखील सुरू करण्यात येत आहेत.
श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर तसेच व्यवस्थापक मनोज श्रोत्री व लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच या प्रक्षाळपुजे निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या पूजेच्या वेळी मंदिरात पौराहित्य करणारे कर्मचारी, विभाग प्रमुख संजय कोकीळ व अतुल बक्षी उपस्थित असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
अमोल बाळासाहेब शेरे, अभिजीत विठ्ठल मोहिते, राहुल ताम्हाणे, राजू शेठ नाईक या दानशूर भाविकांनी भगवा गोंडा 400 किलो, पिवळा गोंडा 400 किलो, शेवंती 1000 किलो, कामिनी 200 किलो, अष्टर 700 किलो, रिबीन 3 किलो, कबूतर 200 किलो, स्प्रे (रंगीत) इत्यादी फुलांचा वापर करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व नामदेव पायरी येथे आकर्षक फुलाची सजावट केली असून, यासाठी 40 कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.