21.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ठिकठिकाणी हाणामारी

राज्यात ठिकठिकाणी हाणामारी

मतदान यंत्राची फोडाफोड

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांच्या गावात या घटनेचे पडसाद उमटले. घाटनांदूरमधील मतदान केंद्रात घुसून तोडफोड करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाची परिस्थिती आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. परळीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली. बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर जाधव यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या मारहाणीचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला. जाधव यांच्या घाटनांदूर गावात या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

परळीत यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आहे. अजित पवार यांच्या पक्षाकडून धनंजय मुंडे, तर शरद पवारांच्या पक्षाकडून राजासाहेब देशमुख रिंगणात आहेत. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. परळीतील बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जाधव मूळचे घाटनांदूरचे आहेत. त्यांना मारहाण झाल्याचे पडसाद घाटनांदूरमध्ये उमटले. जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील मतदान केंद्रात घुसून तोडफोड केली. त्यांच्याकडून मशीन फोडण्यात आली. त्यामुळे काही वेळ मतदान थांबवण्यात आलं. पोलिसांची मोठी कुमक गावात दाखल झाली. राज्य राखीव दलाची तुकडी घाटनांदूरमध्ये तैनात करण्यात आली.

छोटी बाजारपेठ असलेल्या घाटनांदूरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. थांबवण्यात आलेले मतदान उशिरा सुरू करण्यात आले आहे. गावात तणाव कायम आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. दहशत, दादागिरी आणि गुंडशाही असे म्हणत परळीची बदनामी करणारे, प्रत्यक्षात मात्र स्वतःच शेकडोंचा जमाव, हातात लाठ्या-काठ्या घेऊन दगडफेक करत फिरत आहेत, हल्ले करत आहेत, याची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घ्यावी व कारवाई करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले. तुमसर विधानसभेतील मोहाडी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावरच आपापसात भिडले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारांना टाटा सुमोमध्ये बसवून थेट मतदान केंद्रात पोहचविले. यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. या वेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली. सुमारे अर्धा तास मतदान केंद्रावर हा प्रकार सुरू होता. भंडारा पोलिसांनी वेळीच दखल घेत हे प्रकरण शांत केले. 

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली; मात्र याला अपवाद ठरले आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. यानंतर हे प्रकरणाचे रुपांतर थेट हाणामारीमध्ये झाले. धस समर्थकांना शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

नांदगाव मतदारसंघात नोटांचे वाटप करणारी गाडी पकडल्याचा प्रकार घडला. साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी आल्याची माहिती अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांच्या समर्थकांना मिळाली. गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या. एका उत्साही कार्यकर्त्याने गाडीच्या टपावर उभे राहत नोटा फाडल्या. आता घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले; पण सकाळपासूनच राज्यातील विविध मतदान केंद्रांवर अनेक गैरप्रकार घडले आहेत. यामध्ये अनेक मतदान केंद्रांची तोडफोड करण्यात आली, तसेच ‘ईव्हीएम’ मशिनची मोडतोड करण्यात आली. त्याचबरोबर ठिकठिकाणी विरोधी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडाही पाहायला मिळाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
21.1 ° C
21.1 °
21.1 °
46 %
2.1kmh
0 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!