– स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणेच्या वतीने यमुनाबाई (माई) विनायक सावरकर यांचा १३६ वा जयंती महोत्सव संपन्न
– कर्तुत्ववान महिलांचा यमुनाबाई (माई) विनायक सावरकर पुरस्काराने सन्मान
पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध घटकांचे महत्व आहे, स्वातंत्र्यसेनानींच्या लढ्यात, सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबियांचंही मोठा वाटा राहिलेला आहे, विशेषता महिलांचा त्याग, बलिदान मोठे होते परंतु पुरुषांच्या शौर्यामध्ये, कर्तुत्वकथा मध्ये त्यांच्या घरातील महिलांचे कार्य झाकोळले गेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास सांगताना त्यांचा कुटुंबातील महिलांचा त्याग, बलिदान लोकांसमोर आणण्याची आवश्यकता असल्याचे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणेच्या वतीने सेवा भवन, पटवर्धन बाग, एरंडवणा येथे आयोजित यमुनाबाई (माई) विनायक सावरकर यांच्या १३६ व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मराठे बोलत होत्या. यावेळी बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे, राष्ट्र सेविका समिति पुणे महानगर कार्यवाहीका ज्योती भिडे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीतम थोरवे, विश्वस्त श्रीराम जोशी, प्राची देशपांडे, नयन ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रियांका केरकर (दांडपट्टा आणि लाठी काठी प्रशिक्षक), डॉ. उज्चला पळसुले (आर्किटेक्ट हेरिटेज). सोनाली छत्रे ( मुख्याध्यापिका, मुळशी), सीए अंजली खत्री, सीमा दाबके (समाजसेविका दिव्यांग मुले, मुली) यांचा यमुनाबाई माई विनायक सावरकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना मराठे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांना वयाच्या 28 व्या वर्षी काळ्यापाण्याची शिक्षा झाली, तत्पूर्वी बाबराव सावरकर सुद्धा अंदमानात शिक्षा भोगत होते. सावकार बंधु शिक्षा भोगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर सुद्धा जप्ती आणली होती यामुळे कुटुंबातील महिला बेघर झाल्या होत्या, तरीही त्यांनी संयमाने संसार सांभाळला. सावरकरांनी रत्नागिरी येथे वास्तव्यास आसताना केलेल्या अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रमात यामुनाबाई सक्रिय सहभागी होत्या, त्यांनी स्पृश्य समाजातील महिलांमध्ये जनजागृती घडविण्याचे काम केले. दुर्दैवाने त्यांचे कार्य समाजापुढे फारसे न आल्याची खंत मराठे यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाजाला एक करण्यासाठी प्रयत्न केले होते, अखंड हिंदुस्थान हे त्यांचे स्वप्न होते मात्र आज आपल्या देशात हिंदू समाजाला आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हिंदू समाजाने आज एक होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज असल्याचेही मराठे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीतम थोरवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा कुलकर्णी यांनी केले.