बाणेर- बालेवाडी पाषाण सूस भागामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करुन जरब बसववी, असे निर्देश आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिले. तसेच,नव्याने निर्माण झालेल्या बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत चौक्यांचे आणि गस्त वाढवावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
बाणेर मध्ये गुरुवारी ग्लॉस्टर गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत; पाच वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बाणेर पोलीस स्टेशनला भेट देऊन; सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त हिमंत जाधव, खडकी विभागाच्या पोलीस सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने, बाणेर शाखेच्या वाहतूक निरीक्षक श्रीमती सरोदे, बाणेर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, अनिल केकाण, भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, सचिन दळवी, यांच्या सह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनेची सविस्तर माहिती आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना दिली. तसेच, पुढील कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्यावर आ. पाटील यांनी पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करुन; दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्या. तसेच, भागाच्या सुरक्षेसाठी बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर शासन करावी असेही निर्देश दिले.
तसेच, पुणे शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरातील 13 पेक्षा अधिक टेकड्या आणि 7 पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि लाईट्स च्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहे. याची कडक अंमलबजावणी करुन टेकड्या सुरक्षित करण्याचे निर्देश दिले.
शहराचा वाढता विस्तार आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पुणे पोलिस आयुक्तालयात सात नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बाणेर पोलीस स्टेशनचा ही समावेश असून; ८ कोटी ६० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यातही मनुष्यबळ आणि पोलीस चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.