पुणे : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर विवरण परतावा (आयटीआर) भरून परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता स्वयंघोषित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम हाती घेतला आहे. काळा पैसा कायदा (ब्लॅकमनी ऍक्ट) परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न भारतात परत आणण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काळा पैसा कायद्यातील कठोर तरतुदी समजून घ्यायला हव्यात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेक करदात्यांना परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागते,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त व महासंचालक (अन्वेषण) सतीश शर्मा यांनी केले.
आर्थिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काळा पैसा कायद्याच्या पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’ यावर आयोजित आउटरीच प्रोग्रॅमच्या उद्घाटनावेळी सतीश शर्मा बोलत होते. ही मोहिम सरकारच्या पारदर्शक आणि जबाबदार कर प्रणालीच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, करदात्यांनी स्वेच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी व आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही सतीश शर्मा यांनी केले.
बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे प्रधान संचालक मोहित जैन, ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, प्रमुख व्यापारी, करतज्ञ, करदाते उपस्थित होते. प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे अतिरिक्त संचालक सुधांशु शेखर, प्राप्तिकर (अन्वेषण) विभाग-१चे उपसंचालक महादेव धारूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळा पैसा कायद्यासंबंधी सखोल माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी कायद्यातील तरतुदी, त्याची व्याप्ती आणि लागू होणारे नियम यावर सुस्पष्ट माहिती दिली.
परदेशी मालमत्तेतून पैसा निर्माण करण्याची, तसेच तो भारतात आणण्याची प्रक्रिया, बँकांची कार्यप्रणाली, कोणत्या बँकेत खाते असावे, याविषयी महादेव धारूरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी या कार्यक्रमातून आपल्याला परदेशी मालमत्ता कशी तयार केली जाते व त्याचा आपल्या देशाला कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेता आल्याचे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थितांना परदेशी मालमत्तेतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. ज्यात परदेशी बँक खाते, समभाग व कर्ज, व्याज, इतर व्यवसाय/संस्था मध्ये वित्तीय व्याज, चल-अचल मालमत्ता आणि परदेशी मालमत्तेत लाभकारक हक्क यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी उत्पन्नामध्ये व्याज, लाभांश, एकूण प्राप्ती, आणि विमोचन यांचा समावेश केला आहे. या सर्व गोष्टींच्या घोषित न करण्याचे गंभीर परिणाम, जसे की काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत मूल्यांकन, दंड, व्याज आणि कारवाई यावर चर्चा करण्यात आली.
कायदेशीर कामांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासह त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.