पुणे : आदिवासी व ग्रामीण भागातील कुटुंबांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा, या उद्देशाने नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या १० हजार कपडयांची मदत आदिवासी बांधवांना पाठविण्यात आली. सत्या फाउंडेशन, पुणे च्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला सत्या फाऊंडेशनच्या गीतांजली जाधव, जाधवर इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कपडयांनी भरलेल्या टेम्पोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
गीतांजली जाधव म्हणाल्या, कोणतेही पाठबळ, आर्थिक मदत नसताना झोमॅटो सारख्या कंपनीमुळे पुणे आणि लगतच्या परिसरात जवळपास ७० ते ७५ लाख रुपयांचे धान्य वाटप आम्ही करू शकलो. भोर, वेल्हे पानशेत, आंबी यासह अनेक ठिकाणच्या आदिवासी पाड्यांमध्ये धान्य वाटपासोबतच कपडे व इतर वस्तूंचे वाटपही फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेला समाजातील सर्व घटकांमधून मान्यता आणि प्रोत्साहन मिळाल्याने आणखी समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, समाजातील गरजू घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत देण्याकरिता शासनाच्या सर्व यंत्रणा कार्यान्वित असतात. मात्र, सामाजिक संस्थांसह सामान्य नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणिव निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी चांगले कपडे गोळा करुन गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमात मोठा वाटा उचलला आहे.