पुणे : स्वामी भक्त दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या उपस्थितीत सहस्त्र शंकर गीता पारायण सोहळा दरवर्षी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. यावर्षी बुधवार, दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी शंकरगीता पारायण सोहळा सातारा रस्त्यावरील शिवछत्रपती शिवाजी मंगल कार्यालय धनकवडी येथे संपन्न होणार आहे.
सहस्त्र शंकर गीता पारायण समितीच्या माध्यमातून शंकर बाबांच्या भक्त परिवारात हा पारायण सोहळा संपूर्ण वर्षभर कोणतेही मानधन न घेता साजरा केला जातो. आज पर्यंत हजारो भक्तांच्या घरी हा पारायण सोहळा संपन्न झालेला आहे. त्यातूनच नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या बाबाच्या सेवेने होवो, हा उद्देश आहे. या सोहळ्याच्या भक्त परिवारातील समितीचे अनिल हगवणे, कमलेश दुबे, संतोष सपकाळ, तेजस मर्चंट, श्रीधर साळुंखे यांचे हा सोहळा पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य असते.
साधारण दोन हजार लोक पारायणास बसतात. यावर्षी देखील पारायणास साडेतीन हजार भक्तांची नाव नोंदणी झाली आहे. त्यात मुंबई, नाशिक, धुळे, नगर, सातारा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या पारायण सोहळ्यात शेकडोंच्या संख्येने सेवेकरी सुध्दा सहभाग घेतात, तसेच हा संपूर्ण सोहळा हा भक्तांच्या सहकार्याने संपन्न होत असतो.