साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि नवीन मराठी शाळेचा उपक्रम
पुणे : संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘माय मराठीचा जयजयकार असो’ my marathi अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष कार्यक्रमाचे. सुरुवातीस शनिवार वाडा आणि त्यानंतर लाल महाल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेषभूषेत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज sant dnyaneshwar maharaj, संत तुकाराम महाराज sant tukaram, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यलोक अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवे bajiraopeshawe, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह वारकरी, मावळ्यांच्या वेशभूषेत मुले-मुली सहभागी झाले होते.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘मराठी माणसाने मराठी माणसासोबत मराठीतच बोलावे’, ‘मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा’ असे मराठी भाषेची अस्मिता दर्शविणारे फलक तसेच कवी कुसुमाग्रज यांचे छायाचित्र असलेले फलकही विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. मराठी भाषेची धुरा जणू हा बालचमू आनंदाने स्वीकारत आहे आणि मराठी भाषा प्रवाहित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासक चित्र या निमित्ताने पहावयास मिळाले.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती देताना पियूष शहा यांनी मराठी राजभाषा दिनाचे आणि केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. मुलांमध्ये मराठी भाषेविषयी अस्मिता जागृत व्हावी, मराठी बोलण्याचे संस्कार मुलांवर व्हावेत यातूनच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे आणि मराठी भाषा प्रवाहित रहावी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन पियूष शहा व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांची होती. शिक्षक प्रतिनिधी योगिता भावकर, सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख मिनल कचरे, प्रतिभा पारखे, वैशाली पाटील, धनंजय तळपे, साईनाथ ट्रस्ट मंडळाचे विक्रम गोगावले, नंदू ओव्हाळ, गंधाली शहा, समीक्षा सोनवणे, संकेत निंबाळकर, प्रणिता सरदेसाई, तन्वी ओव्हाळ उपस्थित होते.पियूष शहा यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली तर आभार कल्पना वाघ यांन मानले.