.
सद्गुरुचे नाममात्र ।तेचि आम्हां वेदशास्त्र । सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरुचे ।
या भागवतातील नाथ उक्तीप्रमाणे आपल्या गुरुचेच नाव सर्वश्रेष्ठ मानणारे एक अलौकिक महात्मा म्हणजेच जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज येत्या १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात उपस्तिथ राहणार आहेत. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना प्रयागराज येथील महाकुंभात जगदगुरु ही विशेष उपाधी मिळाल्यामुळे त्यांचे भव्य स्वागत व पूजन सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पुणेच नाही तर राज्यातल्या अनेक गावातून बाबाजींचे भक्त परिवार पुण्यात दाखल होतील आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतली अश्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन जय बाबाजी भक्त परिवार, जिल्हा पुणे च्या वतीने करण्यात येणार आहे.
१९८९ साली जनार्धन स्वामी यांचे निर्वाण झाले आणि त्यानंतर २५ डिसेंबर १९८९ साली शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले योगी आहेत. आजन्म ब्राह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे. शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथले आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे ते वेरूळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात आले. मठात त्यांची दृष्टी ठीक झाली त्यामुळे ते परत आपल्या गावी गेले, गावी गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली त्यामुळे महाराज पुन्हा मठात आले. मठात आल्यानंतर जनार्धन स्वामींनी शांतीगिरी महाराजांना मठातच राहायला सांगितलं, मठात राहून शांतीगिरी महाराजांनी संन्यस्त वृत्त स्वीकारलं, मठातच राहून महाराजांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं. शांतीगिरी महाराजांचे छत्रपती संभाजी नगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भगवे कपडे परिधान करणाऱ्या स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत राहिले.

साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.’ या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. बाबाजी पहिल्या प्रसादाची पुडी सुद्धा शांतिगिरीजी बाबांनाच देत असायचे. स्नान घालायचं म्हटलं तरी शांतिगिरीजी बाबा पळत पळत जाऊन पुढे उभे असायचे. इतका अधिकार शांतिगिरीजी बाबांचा जनार्दन बाबांवर होता. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. अखंड नऊ वर्षे मौन व्रताची साधना सुरू झाली. एक शब्दही न बोलता जनार्दन बाबांचे पुण्यस्मरण सोहळे सुरू झाले. बाबाजींचे ११ वे पुण्यस्मरण विश्वशांती सोहळा, १३ वे पुण्यस्मरण श्री राम सिता धर्म सोहळा असेल . किंवा १६ वे पुण्यस्मरण जय हनुमान धर्म सोहळा असेल असे अनेक ‘न भूतो न भविष्यती’ सोहळे करून धर्मसंस्कार शिरोमणीचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. सन २०१७ मध्ये महाराष्ट्र. राज्य मराठी पत्रकार संघाकडून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कारप्रदान करण्यात आला आहे.
शांतिगिरी महाराज आजवर फक्त फलाहार घेतले असून. साधी भगवी वस्त्र, पायात लाकडी खडावा, बसायला पोत्याचे आसन अन मनात सतत जनार्दन बाबांच्या नावाचे चिंतन असे त्यागी, वैरागी जीवन आहे. पुण्यात ते मुकामी असल्याने जय बाबाजी परिवार तर्फे राहण्यासाठी त्यांना एका शेतात कुटी उभारण्यात येणार आहे. हि कुटी गवत, पाचट याने बनवली जाणार आहे. कुटी हि शेणाने सारून त्यात विहिरीचे बोरच्या पाण्याची सोय असणार आहे. बाबाजींच स्वागत करून त्यांची पूजा आणि नंतर आलेल्या भक्तांना त्यांचे आशीर्वाद सोबत येणाऱ्या भक्तांसाठी भोजन ची सोय देखील असणार आहे. जनार्दन स्वामींचे संकल्प पुरे करून खरी गुरुनिष्ठा काय आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतिगिरीजी महाराज आहेत. अश्या संतांचे चरण या पुण्यनगरीत पडणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी हि जोरदार चालू आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर मंडळी देखील हजेरी लावणार आहेत. “जय जय जनार्दन देवा । निरंतर घडो तुमची सेवा” । या उक्तीप्रमाणे सतत जनार्दन बाबांची सेवा घडावी म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वामी शांतिगिरीजी बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन.
सचिन कृष्णा तळे