27.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रभक्ती - शक्तिगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद!

भक्ती – शक्तिगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद!

भक्ती - शक्तिगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद!पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव - प्रथम पुष्प


पिंपरी-श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील प्रथम पुष्प गायक, संगीतकार अवधूत गांधी आणि सहकारी यांनी भक्ती – शक्तीगीतांच्या अफलातून मैफलीच्या माध्यमातून गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड)चिंचवडगाव येथे गुंफले. याप्रसंगी माजी नगरसेवक मधू जोशी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, खजिनदार गणपती फुलारी, सहसचिव मीनल देशपांडे, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, माधव कुलकर्णी आणि हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र…” या भक्तिरचनेने आणि “जय जय रामकृष्ण हरी…” या सांगीतिक जयघोषात मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. एकनाथ महाराजांच्या “कैसी समचरणी ती शोभा…” या रचनेने भक्तिरसाचा परिपोष केला; तर संत चोखोबांच्या “अबीर गुलाल उधळीत रंग…” ही भक्तिरचना वेगळ्या चालीत सादर करूनही श्रोत्यांनी दाद दिली. “श्रीमंत युगाची शिवराय मूर्ती…” या देदीप्यमान इतिहासाचे वर्णन करणाऱ्या अभंगाने श्रोत्यांना नकळत भक्तिरसाकडून वीररसात नेले. “जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही…” या गीताला श्रोत्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामगजर करीत साथ दिली. तुकोबांच्या “हेचि येळ देवा…” या अभंगाने भक्ती शक्तीचा अवघा रंग एकचि झाला, अशी अनुभूती भाविकांना प्राप्त झाली. नाथांच्या पारंपरिक भारुडानंतर ‘पावनखिंड’ या चित्रपटातील “युगत मांडली…” या आधुनिक भारुडाने वन्स मोअर मिळविला; तर “शिवबा राजं…” आणि “चाकर शिवबाचं…” या गीतांना श्रोत्यांनी सामुदायिक गायनसाथ केली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीचा समारोप “स्वामींचे हे देणे…” या भैरवीने करण्यात आला. अभय नलगे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), राजेंद्र बघे (मृदंग), प्रसाद भांडवलकर, हेमंत क्षीरसागर आणि विजय सोनवणे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमादरम्यान पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कोळी यांना मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

त्यापूर्वी, पहाटे ४:३० वाजता श्रींचा पंचामृताने अभिषेक करून प्रकटदिन उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी उत्सव कलशाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर श्रींची आरती, मंडपपूजन, स्वामी स्वाहाकार, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण सोहळा प्रारंभ, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंआरती हे धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी ४ ते ५:३० या कालावधीत भजनसेवा रुजू करण्यात आली. कैलास गावडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर कैलास भैरट यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
40 %
3.3kmh
0 %
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!