पुणे, : “नव्या युगामध्ये आयसी इंजीन बरोबरच ईलेक्ट्रिक कार झपाट्याने वाढतांना दिसत आहेत. भविष्यात हायब्रीड व्हेइकल्स, ईलेक्ट्रिक कार आणि हायड्रोजन कार असे अनेक पर्याय इलेक्ट्रिक कार मध्ये उपलब्ध होतील, लवकरच हे सेक्टर फार मोठा पल्ला गाठणार आहे. या सर्व इंडस्ट्रीला मदत करणारे हे सेंटर अत्यंत महत्वपूर्ण असेल.” असे विचार टाटा मोटर्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नारायण जाधव यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतिने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्सचे अधिकृत उद्घाटन टाटा मोटर्सचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नारायण जाधव, माईर्सचे संस्थापक विश्वस्त व पेट्रॉन प्रा. प्रकाश जोशी आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी डॉ. पारूल जाधव, डॉ. साकेत येवलेकर, डॉ. कृष्णप्रसाद गुणाळे, डॉ. पंकज धात्रक आणि प्रा. हेरंब फडके उपस्थित होते.
माईर्सचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व गुजरातच्या गांधीनगर येथील इंटरनॅशनल ऑटोमोबाइल सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या सहकार्याने एमआयटील डब्ल्यूपीयूत ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हे सेंटर समर्पित आहे. तसेच महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये, उद्योग क्षेत्रातील आणि प्राध्यापकांसाठी अभ्यासक्रम चालविला जाणार आहे.
नारायण जाधव म्हणाले,“सेंटर ऑफ एक्सलन्स हे इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी संशोधन, विकास, कौशल्य विकास आणि उदयोगाशी सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेले केंद्र आहेत.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले, “ ई-मोबिलिटी क्षेत्रात नवोपक्रम, संशोधन व विकासाला प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण प्रदान करणे, उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि ईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच प्रकल्प विकास, सहयोगी संशोधन, करिअर कौन्सिलिंग, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण, उदयोगांशी सल्लामसलत, स्टार्टअप सहाय्य आणि ईव्ही क्षेत्रात संशोधन आणि विकास हे सेंटरचे महत्वाचे काम आहे.