पिंपरी, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘ट्रिब्यूट टू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ (Miracle on Wheels)या सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या अद्भुत नृत्य आणि संगीत प्रयोगाने प्रेक्षकांना भावविवश केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले – भरतनाट्यम, कथ्थक, सुफी नृत्य, मार्शल आर्ट्स अशा विविध नृत्यशैलींचा समावेश असलेले प्रयोग. विशेष म्हणजे, या सर्व कलाविष्कारांत सहभागी होते दिव्यांग कलाकार – ज्यांनी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत कलाविश्वात एक अनोखा ठसा उमटवला.
कार्यक्रमाची निर्मिती आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते व थेरप्युटिक थिएटर तज्ज्ञ डॉ. सय्यद सलाहुद्दीन पाशा यांच्या ‘मिरॅकल ऑन व्हील्स’ या संस्थेमार्फत करण्यात आली होती.

या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर कथ्थक व भरतनाट्यम जुगलबंदी, सुफी नृत्य आणि मार्शल आर्ट्सवरील अभिनयमय सादरीकरणांनी प्रेक्षकांना भारावून टाकले.
या संपूर्ण कार्यक्रमामधून ‘समता, समरसता आणि स्वावलंबन’ यांचा प्रभावी संदेश पोहोचवण्यात आला. कलाकारांनी आपल्या कलादर्शनातून जणू एक सुसंस्कृत समाजाची आकांक्षा प्रकट केली.
प्रेक्षकांकडून मिळाले ‘स्टँडिंग ओव्हेशन’
कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग कलाकारांनी मिळवलेली टाळ्यांची उधळण आणि प्रेक्षकांनी उभं राहून दिलेली दाद हेच या उपक्रमाचं यश अधोरेखित करत होतं. अनेक प्रेक्षकांनी कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी उत्साहाने गर्दी केली.
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमात महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.