मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेसंदर्भातील आरोपांवर भारत निवडणूक आयोगाने स्पष्टता दिली आहे. आयोगाच्या निवेदनानुसार, निवडणूक कायदेशीर तरतुदींच्या अधीनच पार पडल्या असून कोणतीही अनियमितता आढळली नाही.
आयोगाने सांगितले की, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदानात भाग घेतला. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दर तासाला सरासरी 58 लाख लोकांनी मतदान केले. मात्र, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांऐवजी केवळ 65 लाखांनी मतदान केल्याने काहीशा विषमतेचा अनुभव आला, परंतु त्यावरून गैरप्रकार गृहित धरता येणार नाही, असे आयोगाने नमूद केले.
प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसच्या उमेदवारांकडून मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
मतदार यादीसाठी आयोगाने 1950 च्या लोकप्रतिनिधी अधिनियम आणि 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार यादी तयार केली जाते, ज्यात वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाद्वारे अंतिम यादी सर्व पक्षांना दिली जाते. अंतिम यादी प्रसिद्धीनंतर फक्त 90 अपील्स केल्या गेल्या, ज्या एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही कोणतीही मोठी तक्रार नोंदवलेली नाही.
मतदान प्रक्रियेत 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर 97,325 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि 1,03,727 प्रतिनिधी (बीएलए) नेमले गेले होते; यात काँग्रेसच्या 27,099 बीएलएचा समावेश होता. त्यामुळे मतदार यादी संदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार असून ते कायद्याचा अवमान असल्याचे आयोगाने अधोरेखित केले.
24 डिसेंबर 2024 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसला लेखी उत्तर दिले असून तसेच ही माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. पुन्हा पुन्हा अशा आरोपांमुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.